मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
दोन विषयांनी माणसाची शक्ती जागृत होते. दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्तीने माणूस यशापर्यंत पोहोचतो. डोमेस्थीनिस नावाचा एक ग्रीक मुलगा होता. त्याला वक्ता होण्याची इच्छा होती. तो तोतरा होता. त्यावर मात करूनही तो रोज समुद्रावर जाऊन मोठ्या आवाजात तोंडात गारगोट्या दगड ठेवून मोठ्याने ओरडत असे. वेगवेगळे आवाज काढत असे. या सरावाने त्याने त्याच्या अडचणींवर मात केली. तो जगात सर्वश्रेष्ठ महान वक्ता होऊ शकला. असेच उदाहरण आहे एकलव्याचे. जातीव्यवस्थेमुळे एकलव्याला गुरुकुल शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. पण रोज गुरूकडून लपून प्रशिक्षण घेऊन एकलव्य देखील धनुर्धारी झाला.
कोणी काही करो. गप्पा मारो. टीव्ही, मोबाईलवर सदानकदा असो. आपण आपले ध्येय गाठायचेच! ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तीला ध्येयवेडा असल्याने तेथपर्यंत पोहोचता येते. वाट पाहू नका. सुरुवात करा. कामाला लागा. सुरुवातीसाठी हवी तशी वेळ कधीच येत नाही. मग थांबायचं कशासाठी? आहे तिथून सुरुवात करा. लक्षात ठेवा स्वतःला शक्ती आपणच देत असतो आणि स्वतःची शक्ती आपणच काढून घेतो. यशस्वी होण्यासाठी “चिकाटी” महत्त्वाची. माणूस चिकाटी सोडत नाही आणि जर चिकाटी सोडली तर तो यशस्वी होणार नाही. “सातत्य” न थकता अविरतपणे, अखंड, संपूर्ण कार्याला झोकून घ्या. शारीरिक, मानसिक शक्ती एका गोष्टीवर केंद्रित करणे ही यशासाठी लागणारी पहिली अट, असे थॉमस एडिसनने म्हटले आहे. बी पेरा, खत घाला, पाणी द्या, देखभाल करा आणि करतच राहा, देत राहा. जे द्याल तेच घ्याल. हा कर्माचा सिद्धांत आहे. ध्येय निश्चितीने पुढे चला, चालत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
जगात राजा छत्रपतींचे उदाहरण घ्यायचे झाले तर त्यांच्या मेहनतीला, कष्टाला पर्याय नाही. त्यांचे ध्येय, निर्णय, शौर्य, पराक्रम, नियोजन, कृती पाहता आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. आदर्श, मूल्य, सेवा, धर्म, राजनीती, प्रज्ञा, प्रजादक्षता, ऐक्य, आदर, अष्टप्रधान मंडळ, विकास शिस्त, संयम, एकजूट, व्यवस्थापन, सर्वसमावेशकता, समता नियोजन आणि कृती यावरून हे छत्रपती अजरामर झाले.






