Sunday, December 14, 2025

“राष्ट्रप्रेम, सेवा आणि संघटनशक्तीचा संगम म्हणजे रेशीमबाग”

“राष्ट्रप्रेम, सेवा आणि संघटनशक्तीचा संगम म्हणजे रेशीमबाग”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी दिली नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयाला भेट

नागपूर : "रेशीमबागेत आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची वेगळी अनुभूती मिळते. येथून समाजसेवा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेऊन कार्यकर्ते कार्यरत होतात. देशभरच नव्हे तर जगभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा कार्यरत असून, हे संघटनात्मक सामर्थ्य उल्लेखनीय आहे", असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीमबाग येथे भेट दिली. याप्रसंगी त्यांनी डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर येथे अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे मंत्री आणि पदाधिकारीही उपस्थित होते. भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकी कार्याचा गौरव केला.

डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना सातत्याने प्रेरणा देणारे असून, समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचे बळ त्यातून मिळते, असे शिंदे यांनी सांगितले. शंभर वर्षांपूर्वी परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यामुळे नागपूर ही केवळ उपराजधानी नसून संघाची जन्मभूमी आहे, असे त्यांनी नमूद केले.

शंभर वर्षे निरपेक्ष भावनेने का ?

- इथे येणारा प्रत्येक स्वयंसेवक जात, भाषा आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाची शिकवण घेऊन देशसेवेत सहभागी होतो. कुठलीही प्रसिद्धी किंवा अपेक्षा न ठेवता शंभर वर्षे निरपेक्ष भावनेने कार्य करणारी संघटना असणे ही ऐतिहासिक बाब आहे, असेही शिंदे म्हणाले.

- आपत्ती आणि संकटाच्या काळात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही निरपेक्ष भावनेने मदतीसाठी पुढे येतात. समाजाभिमुखता, राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती ही मूल्ये संघाच्या कार्यातून सातत्याने दिसून येतात, याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा