Saturday, December 13, 2025

माणूस बदलू शकतो

माणूस  बदलू शकतो

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर

माणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती, अनुभव, चांगले-वाईट प्रसंग यांमुळे त्याच्या स्वभावात आणि आयुष्यात बदल घडत जातात. म्हणूनच “माणूस बदलू शकतो” हे वाक्य केवळ शब्द नाहीत, तर जीवनाचा मूलभूत सत्य आहे. बदल हेच जगाचे वैशिष्ट्य आहे आणि मनुष्य त्याला अपवाद नाही.

१. बदलाची सुरुवात – आत्मजाणिवेतून माणूस खऱ्या अर्थाने तेव्हाच बदलतो, जेव्हा त्याच्या मनात आत्मजाणिवा निर्माण होतात. जसे - “मी असे का वागतो?” “मी स्वतःला सुधारू शकतो का?” “माझ्यामुळे कोणाला त्रास होतोय का?”

या प्रश्नांची उत्तरे शोधताना तो स्वतःकडे पाहायला शिकतो आणि सुधारणेची पहिली पायरी चढतो.

अवगुण सोडिता जाती । उत्तम गुण अभ्यासिता येती । कुविद्या सोडून शिकती । शहाणे विद्या ॥

एका संस्कृत सुभाषितकारांनी म्हटले आहे - “स्वभावो दुरति क्रमः” । याचा अर्थ मनुष्याचा स्वभाव बदलणं खूप कठीण आहे. अर्थात, वाईट सवयी आणि वागणं हे जीवाभावाचं असतं. पण, त्यांच्या वेळ, माणूस बदलू शकतो, योग्य संस्कार आणि प्रयत्नांनी, आपण आपल्या जीवनाला हवा तसा आकार देऊ शकतो. माणूस बदलू शकतो; परंतु बदलण्याची तीव्र इच्छा त्याच्या अंगी असली पाहिजे.

अंगुलीमाल गुन्हेगार होता. त्याने शंभर माणसांची हत्या करून त्यांच्या करंगळीची माळ करून गळ्यात घालायचे ठरवले होते. त्याच्या कृत्यांमुळे गावकरी भयभीत होते. एके दिवशी भगवान बुद्ध त्याच्या भेटीस गेले. बुद्धांनी त्याला झाडाची फांदी तोडावयास सांगितली. त्यांनी फांदी तोडली. बुद्धांनी ती फांदी परत त्याला जोडायला सांगितली. ती फांदी झाडाला जोडता येणे शक्य नव्हते. तेव्हा बुद्धांनी त्याला समजावले - ज्याला जोडता येत नाही त्यांनी तोडू नये. ज्याला जीवन देता येत नाही त्याला कोणाला मृत्यू देण्याचा अधिकार नाही.

बुद्धांच्या उपदेशाने अंगुलीमाल पूर्ण बदलला. पुढील काळात तो बुद्धांचा लाडका संन्यासी झाला.

माणसाने जर मनावर घेतले तर ५ - ६ वर्षांत तो स्वतःच्या स्वभावात हवा तसा बदल घडवू शकतो.

२. बदलासाठी आवश्यक म्हणजे सकारात्मक विचार. मनुष्य सकारात्मक विचार स्वीकारतो तेव्हा त्याचे वागणे, बोलणे आणि निर्णय घेण्याची शैली बदलते. सकारात्मकतेमुळे - राग कमी होतो, सहनशीलता वाढते, नाती दृढ होतात, आत्मविश्वास वाढतो

अशा विचारांमुळे माणूस आधीपेक्षा अधिक सक्षम आणि शांत बनतो.

३. अनुभव माणसाला बदलून टाकतात. जीवनातील प्रसंग माणसाला घडवतात आणि घडवून बदलवतात.

कधी एखादी चूक, कधी एखादा कठोर प्रसंग, कधी अपयश किंवा जिव्हाळ्याचे नाते - हे अनुभव मनाला ढवळून टाकतात आणि सुधारणा करण्यास भाग पाडतात.

४. सवयी बदलल्या तर जीवन बदलते.

माणसाचे वागणे त्याच्या सवयींवर अवलंबून असते. खराब सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारल्या तर जीवनाचा मार्गच बदलतो. उदा. - वेळेचं नियोजन वाचनाची सवय शांतपणे विचार करून निर्णय आरोग्य राखण्याची शिस्त या सवयी व्यक्तिमत्त्वात सुंदर परिवर्तन घडवतात.

५ . समाज व कुटुंबाचा प्रभाव चांगले मित्र, सकारात्मक सहकारी, मार्गदर्शक शिक्षक किंवा एखादे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व माणसाला योग्य दिशेने बदलायला मदत करतात. समर्थन, कौतुक, प्रोत्साहन हे बदल टिकवतात.

६. इच्छाशक्ती सर्वांत महत्त्वाची माणूस बदलतो कारण तो बदलायचे ठरवतो. इच्छाशक्ती, सातत्य आणि ध्येय यांमुळे कोणताही मनुष्य वाईटातून चांगल्याकडे प्रवास करू शकतो. “माणूस बदलू शकतो” हे केवळ विधान नाही - तो जीवनाचा शाश्वत संदेश आहे.

बदल हा वेळ, परिस्थिती आणि इच्छाशक्ती यांचा सुंदर मिलाफ आहे.

स्वतःच्या चुका मान्य करून, सकारात्मकता स्वीकारून आणि योग्य मार्गदर्शन घेऊन मनुष्य स्वतःचे आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतो.

म्हणूनच - बदलाची सुरुवात आपणच करू या. आणि इतरांनाही बदलण्याची संधी देऊ या.

Comments
Add Comment