एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ अंतर्गत प्राप्त ४२६ घरांची संगणकीय सोडत शनिवारी १३ डिसेंबर २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने महानगरपालिका मुख्यालयात काढण्यात आली. या सोडत प्रक्रियेदरम्यान एकूण ४२६ घरांपैकी ३७३ अर्जदारांना घरे जाहीर करण्यात आली. दरम्यान, मुंबई महापालिकेला आणखी २९६ सदनिकांसाठी सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये या सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांबाबतची माहिती महानगरपालिकेमार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेच्यावतीने काढण्यात आलेल्या ४२६ घरांच्या लॉटरीची सोडत अखेर काढण्यात आली आहे. यामध्ये ३७३ सदनिकांची सोडत काढण्यात आली आणि ३६२ अर्जदार या प्रक्रियेदरम्यान प्रतीक्षा यादीवर आहेत. सदनिका विजेत्या यशस्वी अर्जदारांना ईमेलद्वारे माहिती कळविण्यात येणार आहे. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी पुढील प्रक्रियेसाठी संपर्क साधण्यात येईल. पत्रही पाठवण्यात येईल. सोडत प्रक्रियेतील यशस्वी तसेच प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची माहिती ही महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महानगरपालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीतील माहिती फलकावरही ही यादी सोमवार १५ डिसेंबर २०२५ रोजी पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
दिव्यांगांना व्यवसायासाठी परवाना आणि गाळे वाटप
मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागामार्फत महानगरपालिका मंडईमध्ये ५ टक्के दिव्यांग आरक्षणांतर्गत दिव्यांग नागरिकांना व्यवसाय करण्याकरिता अनुज्ञापत्र व गाळे / स्टॉल/ जागा इत्यादींचे ऑनलाईन पध्दतीद्वारे सोडतही शनिवारी १३ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सोडतीदरम्यान एकूण ४३ यशस्वी दिव्यांग लाभार्थी अर्जदारांची घोषणा करण्यात आली. तसेच प्रतीक्षा यादीवरील ४३ दिव्यांग लाभार्थी अर्जदारांची यादीही यावेळी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मंडईमध्ये दिव्यांग आरक्षणांतर्गत एकूण ४३ लाभार्थींना मंडईनिहाय अनुज्ञापत्र व गाळे तथा जागा वाटप करण्यात येईल. मंजूर धोरणानुसार दिव्यांग लाभार्थींची आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अनुज्ञापत्र व गाळे / जागा वाटपाबाबतची कार्यवाही करण्यात येईल.






