Saturday, December 13, 2025

अच्छा लगता हैं!...

अच्छा लगता हैं!...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

आपण नेहमी आपल्याला आवडलेल्या गाण्यांना ‘जगजीत सिंगची गझल’, ‘चित्रा सिंगची गझल’, ‘मेहंदी हसनची गझल’ किंवा ‘लतादीदीचे गाणे’ ‘आशाताईंची गझल’ असे म्हणतो. पण हा फार मोठा अन्याय असतो हे आपल्या लक्षात येत नाही! गझल असते असद भोपाली किंवा कैफी आझमी यांची, गाणे असते ‘शैलेद्र’चे पण आपण कवीबद्दल चकार शब्द न काढता गायकालाच सगळे श्रेय देऊन टाकतो!

गाण्याचा आत्मा त्यातली शायरी असते, संगीत आणि आवाज हे त्याला मिळालेले केवळ शरीर आणि कलाकाराने दाखवलेली त्याची गायकी हे त्या कवितेला चढवलेले अलंकार असतात. चोखा महाराजांनी तर पांडुरंगालाही विचारले होते- “काय भुललासी वरलीया रंगा?”

ज्यांच्या गझला भारतीय गायकांबरोबर पाकिस्तानी गायकानींही गायल्या, लोकप्रिय केल्या असे एक कवी होते ‘काजी सैयद ज़ुबैर अहमद जाफरी’. सुमारे ९९ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या या कवीबाबत महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे उर्दूतले हे नामवंत शायर १९४९ साली मुंबईत आले आणि मुंबईचेच झाले. उर्दू साहित्यात ते ‘क़ैसर-उल जाफरी’ या टोपणनावाने वावरले. त्यांच्या गझला पंकज उधास पाकिस्तानचे गुलाम अली, मुन्नी बेगम यांनी गायल्या. उपखंडातील दोन्ही-तिन्ही देशात त्या गाजल्या. त्या आजही अनेक दर्दी रसिकांना आठवतात.

कैसर जाफरीसाहेब जिथे राहिले त्या ठाणे जिल्ह्यातील कौसा मुंब्र्यातल्या एका रस्त्याला शासनाने त्यांचे नावही दिलेले आहे. अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या या कवीचे ‘रंग-ए-हिना’, ‘अगर दरिया मिला होता’, ‘संग-आशना’, ‘दश्त-ए-बे-तमन्ना’, ‘नबूवतके चराग’, ‘चराग-ए-हरम’ हे काव्यसंग्रह विशेष लोकप्रिय झाले.

उर्दू शायरी हे एक अद्भुत विश्व आहे. अलीकडे पाश्चिमात्य संगीत, भाषा, संस्कृती, पेहराव यांचा प्रभाव नव्या पिढीवर जास्त आहे तरी जो अवर्णनीय आनंद उर्दू शायरी तुम्हाला देऊ शकते तो इतर कोणताच प्रकार देऊ शकत नाही. मानवी मनात उमटणाऱ्या ज्या भावलहरी शब्दात व्यक्त होऊच शकणार नाहीत असे वाटते त्याही उर्दू कवी दोन ओळींच्या ओंजळीतून आपल्या तळहातावर ठेवतात!

आता हेच पहा ना कधी कधी माणसाला टोकाचे वैफल्य येते. मनात सतत घेर धरणारे विचार असह्य वेदना देऊ लागतात. तो छळ सहन करण्यापेक्षा मी वेडा होईन तर बरे असे वाटू लागते. ही अवस्था काव्याचा विषय होऊ शकते का? पण कैसर उल जाफरी साहेबांनी त्यावरच एक गझल लिहिली आणि ती कमालीची लोकप्रिय झाली. शब्द होते -‘दीवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है. हम भी पागल हो जाएँगे ऐसा लगता है.

ज्याला आयुष्यात सुख, शांती, प्रेम मिळालेच नाही त्याला ते क्षणभर जरी मिळाले तरी त्याची केवढी अपूर्वाई वाटते हे सांगताना कवी म्हणतो

‘कितने दिनोंके प्यासे होंगे यारो सोचो तो,शबनमका कतरा भी जिनकोदरिया लगता है!’

आता कवीला जिवलग व्यक्ती कायमची सोडून गेली आहे. पुनर्भेट शक्य नाही! तरीही उगाचच आशा वाटत राहते. प्रेमाच्या एका अवस्थेत तिला किंवा त्याला नुसते दुरून पाहिले तरी दिलासा वाटतो. सोडून गेलेल्या प्रेमिकेच्या आठवणीत कवी इतका दु:खी आहे की त्याला समोरून येणारी प्रत्येक व्यक्ती तिच्यासारखीच वाटू लागते. कुणाचीही आतुरतेने वाट पाहताना प्रत्येकाने आयुष्यात हा अनुभव कधी ना कधी घेतलेलाच असतो. अनेकदा तर तीच परत येत असल्याचा भास होत रहातो. ‘पारसमणी’मध्ये असद भोपालींनी रफीसाहेबांच्या आवाजातल्या ‘वो जब याद आये बहुत याद आये’मध्ये सुद्धा हीच भावना व्यक्त केली होती.

कई बार ऐसा भीधोका हुआ हैं,चले आ रहे हैं वो नजरे झुकाये, वो जब याद आये बहुत याद आये

....आणि होतेच ना तसे! आशा अमर असते. सगळे संपले असूनही प्रेमीकाच्या मनात आशेची ज्योत तेवतच असते. असद भोपालींच्या त्याच भावनेला वेगळ्या शब्दात मांडताना कैसरसाहेब म्हणतात-

आँखोंको भी ले डूबा ये दिलका पागलपन, आतेजाते जो मिलता है तुमसा लगता है.’

ज्याचे दु:ख त्याच्यासाठी आभाळाएवढे असते. जग थोडा वेळ सहानुभूती दाखवते पण त्यालाही मर्यादा असतात. कारण या जगात संपूर्ण सुख कुणालाच मिळत नसते. आणि प्रेमाबाबत तर जवळजवळ प्रत्येकाने धोका खाल्लेला असतोच. त्याच्याही मनाच्या खोल अंधारात कुठेतरी त्याची वेदना आतून टोचत असतेच. त्यामुळे ती व्यक्ती स्वत:च दु:खात असताना कवीचे कितीसे सांत्वन करणार? ‘इस बस्तीमें कौन हमारे आँसू पोंछेगा, जो मिलता है उसका दामन भीगा लगता है.’

म्हणजे माझ्यासारखा प्रत्येकजण त्याच्या मनात अश्रू ढाळतोच आहे असे कवीला वाटू लागते. अशा वेळी गझलगायिका डिम्पल भूमी यांनी ऐकवलेला खुमार बाराबंकवी यांचा एक शेर हमखास आठवतो.

मुझे भी वोही याद आने लगे हैं, जिन्हे भूलनेमेजमाने लगे हैं.’

असेच दुसरे एक रोमँटिक शायर असरार उल हक मजाज आपल्या प्रेमिकेला दिलासा देताना म्हणतात, ‘शक्य असेल तर मला विसरून जा. पण तिला ही सवलत देताना ते मनातली वेदनाही सांगून टाकतात.

तुम्हारे बसमें अगर हो तो भूल जाओ मुझे,तुम्हें भुलानेमें शायद मुझे ज़माना लगे.’

इकडे एकाकीपणाच्या दु:खात बुडालेले कौसरसाहेब म्हणतात, ‘माझे घर उदास एकटेपण घेऊन उभे असते. सायंकाळ झाली की त्याच्याभोवती आठवणी फेर धरु लागतात. मनात आठवणीची जणू जत्राच भरते’.

दुनियाभरकी यादें हमसे मिलने आती हैं. शाम ढले इस सूने घरमें मेला लगता है.

शेवटी या भावनिक कोलाहलातून आपली सुटका व्हावी म्हणून चक्क वेडे होणे सुद्धा मान्य असलेले कविवर्य म्हणतात मी वेडा झालो तरी कुणाला दगड मारू? या जगाच्या कांचमहालात तर मला सगळी माझीच प्रतिबिंबे दिसताहेत!

किसको पत्थर मारूँ ‘कैसर’ कौन पराया है, शीश-महलमें इक इक चेहरा अपना लगता है.’

ज्यांना विसरण्यासाठी अख्खे आयुष्यसुद्धा पुरले नाही त्यांच्या आठवणी जर अशा पुन्हापुन्हा सतावू लागल्या, तर आपले दु:ख मनातल्या मनात उत्कटपणे साजरे करणाऱ्याअशा उर्दू गझलांना पर्याय नसतो!

Comments
Add Comment