क्षमा आणि शिक्षा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर


संत एकनाथांच्या बाबतीत असं सांगतात की एकदा एकनाथ महाराज नदीवरून स्नान करून येत असताना एक मुसलमान तरुण त्यांच्या तोंडावर थुंकला. त्या तरुणाला वाटलं की एकनाथ महाराज चिडतील, भडकतील. त्यांची शांती ढळेल. पण झालं भलतंच. एकनाथ महाराज शांतपणे पुन्हा नदीवर गेले आणि स्नान करून परतले. पुन्हा तोच प्रकार घडला. तो मुसलमान तरुण एकनाथ महाराजांच्या तोंडावर पुन्हा थुंकला. एकनाथ महाराज पुन्हा नदीवर गेले आणि शांतपणे स्नान करून आले. हा प्रकार पुन्हा घडला. पुन्हा पुन्हा घडला. एकनाथ महाराजांची शांती काही ढळली नाही. पण तो मुसलमान तरुण मात्र बेचैन झाला. चिडला.


त्या मुसलमान तरुणानं चिडून थुंकायचं आणि एकनाथ महाराजांनी शांतपणे मागे वळून नदीवर जाऊन पुन्हा स्नान करायचं हा प्रकार एक-दोन नव्हे, तर तब्बल एकवीस वेळा घडला आणि बाविसाव्या खेपेला मात्र त्या तरुणाला पश्चात्ताप झाला आणि त्याने एकनाथ महाराजांचे पाय धरले.


ही गोष्ट तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. मी देखील ही कथा अनेकदा वाचलीय. ऐकलीये.


शाळेच्या जीवनात गोष्टीच्या तासाला, कीर्तन प्रवचनातून, अगदी मॅनेजमेंटच्या अनेक सेमिनारमधून सुद्धा... प्रत्येक वेळी एकच तात्पर्य सांगितलं जायचं.


‘तुम्ही इतरांशी चांगले वागा. इतर कुणीही कितीही दुष्टपणा केला तरी त्याचा राग न करता उदार अंतःकरणाने त्याला क्षमा करा.’


एकनाथ महाराजांची हीच गोष्ट कुठल्याशा सुफी संताच्या बाबतीतही घडली होती असं सांगतात. ही गोष्ट कुणाच्या बाबतीत घडली याचा तपशील महत्त्वाचा नाहीये. तो थुंकणारा मुसलमान होता की, हिंदू होता हे देखील महत्त्वाचं नाहीये. कुणीतरी एक दुर्जन एका सज्जनाच्या तोंडावर थुकला आणि त्या सज्जनाने त्याचा राग न धरता त्याला क्षमा केले. आजही ही कथा पुन्हा एका मासिकात वाचली. पण आज मात्र माझ्या मनात वेगळाच विचार आला. एका दुर्जनानं सज्जनाच्या अंगावर पुन्हा पुन्हा थुंकणं आणि त्या सज्जन माणसाने मात्र त्या दुर्जनाला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हा त्या सज्जनाची क्षमाशीलता की भ्याडपणा ?


कथेमध्ये शेवटी एकवीस वेळा थुंकल्यानंतर त्या दुर्जनाचे हृदय परिवर्तन झाल्याचं सांगतात. पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र...?

चला जरा इतिहासाची पानं चाळूया...

महम्मद घोरीने पृथ्वीराज चौहानवर अठरा वेळा स्वारी केली. रजपुतांनी केलेल्या कडव्या प्रतिकारामुळे महम्मद घोरीचा सतरा वेळा पराभव झाला. प्रत्येक खेपेस हरलेल्या घोरीला महाराज पृथ्वीराज चौहानसमोर बंदी बनवून उभं करण्यात आलं. प्रत्येक खेपेस महंमद घोरीनं दयेची भीक मागितली आणि पृथ्वीराज चौहानने उदार अंतःकरणाने त्याला क्षमा करून जिवंत सोडून दिला...

हा प्रकार एक दोनदा नव्हे, तर तब्बल सतरा वेळा घडला. अठराव्या वेळी मात्र महम्मद घोरीने बाजी मारली. पृथ्वीराज चौहानचा पराभव झाला. हरलेल्या पृथ्वीराज चव्हाणला बंदी म्हणून महम्मद घोरीच्या समोर उभं करण्यात आलं आणि...

 

महम्मद घोरीने एका क्षणाचाही विलंब न लावता पृथ्वीराजचा शिरच्छेद केला. कोणत्याही प्रकारची संधी न देता पृथ्वीराजवर तलवार चालवली गेली. पृथ्वीराज चौहानचा शिरच्छेद करून घोरी गुर्मीत गरजला होता,

‘हाती सापडलेल्या शत्रूला जिवंत सोडायला मी काही पृथ्वीराजसारखा मूर्ख नाहीये.’क्षमाशील वृत्तीचा पृथ्वीराज चौहान... पराक्रम असून देखील अती चांगुलपणामुळे मारला गेला.

पृथ्वीराजची क्षमाशीलता हा त्याचा गुण न ठरता दोषच ठरला. त्याचं औदार्यच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरलं. जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणूनच कुणाला क्षमा करायची आणि कुणाला शिक्षा करायची याचे काही नियम आहेत.

क्षमा आणि शिक्षेतला पहिला नियम म्हणजे दुर्बळाला क्षमा करावी. दुर्जनाला क्षमा करू नये.

चुकून चुकलेल्यांना क्षमा करावी, मुद्दाम चूक करणाऱ्याला शिक्षाच करायला हवी. हा सोपा आणि मूलभूत नियम आहे. पण आपण हा मूलभूत नियमच विसरलो आणि त्यामुळेच तर सगळा घोटाळा झाला.

जरा विचार करा. त्या संताच्या अंगावर थुंकणाऱ्या त्या तरुणाला पहिल्याच वेळी कुणीतरी तडाखा हाणला असता तर...?

तर त्याची पुन्हा पुन्हा थुंकण्याची हिंमतच झाली नसती. अन् केवळ त्यालाच नव्हे तर इतरांनाही जरब बसली असती. पण क्षमाशीलतेच्या अतिरेकामुळे आणि अहिंसेचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे केवळ व्यक्तींचेच नव्हे तर अखंड राष्ट्राचं नुकसान झाल्याचे अनेक दाखले आपण पाहतो.

हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला प्रसंगी शस्त्र हाती घ्यावं लागलं तरी हरकत नाही. प्रत्यक्ष देवांनीही वेळप्रसंगी शस्त्र वापरल्याची उदाहरणं आहेत.

सीताहरणानंतर रामाने हनुमंतास पाठवून रावणाला प्रथम समज दिली. पण नंतर मात्र लंकेवर आक्रमण करून त्याचा वध केला.

भगवान श्रीकृष्णाने तर अनेक राक्षसांचा आणि दुर्जनांचा समाचार घेऊन ‘परित्राणाय साधूनाम्’च्या सोबतीनंच ‘विनाशायच दुष्कृताम्’ हे ब्रीद सार्थ केलं.
म्हणूनच मला वाटतं की क्षमा करण्यासाठी प्रथम शक्ती प्राप्त करायला हवी आणि ती प्राप्त केल्यानंतरदेखील कुठे क्षमा करावी आणि कुठे शिक्षा करावी याचा विवेक बाळगायला हवा.

चुकून चुकणाऱ्याला, दुर्बळांना क्षमा करावी. मुद्दाम चूक करणाऱ्या दुर्जनांना शासनच करायला हवं.
Comments
Add Comment

दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्ती

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे दोन विषयांनी माणसाची शक्ती जागृत होते. दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्तीने माणूस

सुगंध कर्तृत्वाचा

स्नेहधारा : पूनम राणे इयत्ता आठवीचा वर्ग. वर्गात स्काऊट गाईडचा तास चालू होता. अनघा बाई परिसर स्वच्छता आणि

स्त्रीधन

क्राइम : अॅड. रिया करंजकर समाजामध्ये नजर टाकली, तर लग्न टिकवण्यापेक्षा घटस्फोटाचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत

देवराई

देवराई ही संकल्पना आता लोकांना नवीन नाही. पण ही संकल्पना फक्त देवाचे राखीव जंगल किंवा देवाचे वन एवढ्यापुरती न

अच्छा लगता हैं!...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे आपण नेहमी आपल्याला आवडलेल्या गाण्यांना ‘जगजीत सिंगची गझल’, ‘चित्रा सिंगची

तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर : दगडात कोरलेला वास्तुग्रंथ

विशेष : लता गुठे भारतात अनेक राज्यांमध्ये हजारो वर्षांपासून काही ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आजही