मुंबई : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. शनिवारी मेस्सी कोलकाता येथे होता. पण आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे कोलकाता येथील कार्यक्रमाचा पुरता बोजवारा उडाला. तृणमूल काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि त्यांचे नातलग यांनाच मेस्सीला जवळून भेटणे शक्य झाले. हजारो रुपयांची तिकिटं खरेदी करणारे मेस्सीचे शेकडो चाहते नाराज झाले. चाहत्यांनी त्यांची नाराजी स्टेडियममध्ये नासधूस करुन जाहीर केली. अखेर पोलीस बळाचा वापर करुन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पण या घटनेमुळे मुंबईतील आयोजनासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
मेस्सी आज म्हणजेच रविवार १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत असेल. मेस्सी मुंबईत असल्यामुळे वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
लिओनेल मेस्सी मुंबईत आल्यावर वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉन स्टेडियमवर जाणार आहे. संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहेत. त्यामुळे मुंबईत गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचा विचार करुन वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल केले आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
स्टेडियमवर पार्किंगला परवानगी नाही आहे. सी,डी,ई,एफ,जी रस्ते, नरीमन रोड, दिनशॉ वाच्छा रोड, जमशेदजी टाटा रोड आणि एन.एस. रोडवर तात्पुरते निर्बंध लागू
एकमार्गी वाहतूक : डी एन रोड (पश्चिम-पूर्व),ई रोड (दक्षिण दिशेने), वीर नरीमन रोडला प्रवेश मर्यादित.
रस्ते बंद : किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोड (मरिन ड्राईव्ह अर्थात नेताजी सुभाषचंद्र बोस रोड ते वरळी/ताडदेव आणि प्रमुख चौकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.)






