कोकण आयकॉन : सतीश पाटणकर
मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अत्यंत देखणे, डॅशिंग, सदाबहार नट म्हणून रमेश भाटकर ओळखले जात. शेवटपर्यंत ते नाट्य-चित्रपटांमध्ये सक्रिय होते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मध्ये ते पृथ्वीराज चव्हाणांच्या भूमिकेत होते. डॉ. काशिनाथ घाणेकरांनी गाजवलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’मधील लाल्याच्या भूमिकेसाठी‘नाट्यसंपदा’चे निर्माते प्रभाकर पणशीकर यांना तितक्याच तोलामोलाची रिप्लेसमेंट मिळाली ती रमेश भाटकरांच्या रूपात!
घाणेकरांनी छाप पाडलेल्या भूमिकेवर आपली नाममुद्रा उमटवणे हे खचितच सोपे नव्हते; परंतु रमेश भाटकरांनी आपल्या शैलीदार अभिनयाने या भूमिकेवर आपली वेगळी मोहोर उमटविली. असे अपवादानेच घडते. मराठी प्रेक्षकांना उत्तम अभिनय करणारा नट आवडतो. मग त्याच्याकडे चारआणे रूप कमी असले तरी त्यांना चालते. रमेश भाटकर याला अपवाद होते. त्यांच्याकडे रूपाबरोबरच शैलीदार अभिनयही होता. अलीकडे त्यांचे नाटक-सिनेमे कमी झाले होते तरी ग्रामीण भागातली त्यांची क्रेझ जराही कमी झाली नव्हती. अनेक वर्षे नाट्य संमेलनातील दिंडीचे ते प्रमुख आकर्षण असत. दिंडीतील त्यांचे उत्स्फूर्त जोशिले नृत्य अनेकांच्या पायांना ताल धरायला लावीत असे. भाटकरांची अनेक रूपे होती. ते उत्तम वाचक होते. चांगले गायक होते. आपले वडील संगीतकार स्नेहल भाटकरांकडून त्यांना हा वारसा मिळाला होता. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना ते आवर्जून सपत्नीक हजेरी लावत. ते एक संवेदनशील कलावंत होते. ‘प्रेमाच्या गावा जावे’ या पुनरुज्जीवित नाटकाच्या एका दौऱ्यात हवा तसा प्रेक्षक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी निर्मात्याकडून मानधन घेण्यास नकार दिला होता. गप्पांच्या मैफलीचे ते बादशहा होते. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत प्रदीर्घ काळ
संचार केल्यामुळे त्यांच्यापाशी अनुभवांचे मोठे संचित होते. त्यातून ते या क्षेत्रांत येणाऱ्या नव्या मंडळींना सल्ला देत, मार्गदर्शन करीत. आपल्या व्याधीच्या दुर्धरतेची कल्पना आल्यावर कोसळून न पडता उरलेल्या दिवसांत आपल्या आवडीच्या कला क्षेत्रात जमेल तितके कार्यरत राहण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. ही खरोखरीच दुर्मीळ बाब होय. ‘आनंद’ सिनेमातील राजेश खन्ना, रमेश भाटकर यांनी आपल्या प्रत्यक्ष जगण्यातून सार्थ करून दाखविला. असे धीरोदात्तपणे वास्तवाला सामोरे जाणे क्वचितच पाहायला मिळते. माणूस व कलावंत म्हणून ते किती सखोल होते, हे त्यांच्या या अखेरच्या दिवसांत त्यांनी दाखवून दिले.
आपल्या दमदार अभिनयाने रमेश भाटकर यांनी तीन दशके मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर आपला दबदबा राखला. टीव्ही मालिकांमधील त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका लोकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. १९७५ साली ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकात त्यांनी ‘लाल्या’ची भूमिका निभावली होती. सुरुवातीच्या काळामध्ये दूरदर्शनवरील मालिकांच्या माध्यमातून भाटकर यांचा चेहरा घराघरांमध्ये पोहोचला होता. रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम असले तरी मालिकांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रिय केले. १९९० ते २००० सालामध्ये त्यांनी अनेक मालिकांमधून अजरामर भूमिका साकारल्या. दुर्दशनवर १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘हॅलो इन्स्पॅक्टर’ आणि ‘दामिनी’ या दोन मालिकांमधील भूमिकांमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर झीटीव्हीवरील ‘कमांडर’ आणि ‘डीडी टू’वरील तिसरा डोळा या मालिकेमधील गुप्तहेराच्या भूमिकेसाठी ते आजही ओळखले जातात. यानंतरही ते ‘हद्दपार’, ‘बंदिनी’, ‘युगंधर’ या मालिकांमधूनही भाटकर छोट्या पडद्यावर दिसले. याशिवाय बी. पी. सिंग यांच्या सिर्फ ‘चार दिन’ या छोट्या टेलिफिल्ममध्येही रमेश यांनी काम केले होते. काही महिन्यांपूर्वीच ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकांमधून त्यांनी अभिनय केला होता. आपल्या कारकिर्दीमध्ये ३० मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांचे एकूण हजारांहून अधिक भाग प्रदर्शित झाले आहेत. १९९० च्या दशकामध्ये रामेश भाटकर हे खऱ्या अर्थाने या टीव्हीवरील हिरो होते. ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’ या त्यांनी अभिनय केलेल्या मालिका गाजल्या. रमेश भाटकर यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरूनच झाली. ‘केव्हा तरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’,‘राहू केतू’, ‘मुक्ता’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. १९७७ ला ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘अष्टविनायक’, ‘दुनिया करी सलाम’, ‘आपली माणसं’यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. वयाची सत्तरी गाठली तरी भाटकर यांचा कामाचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
वार्धक्याच्या खुणाही त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसल्या नाहीत. खऱ्या अर्थाने ते चिरतरुण होते.






