कथा : प्रा. देवबा पाटील
त्या दिवशीही सीता व निता या दोघी बहिणींनी शाळेतून घरी येताबरोबर आपला अभ्यास करून घेतला. नि त्या आपल्या मावशीसह गच्चीवर जाऊन बसल्या.
“साबणाच्या नळीवाटे फुगे बाहेर पडतात, पण मग स्ट्रॉ च्या नळीद्वारे पेय तोंडात कसे ओढले जाते?” सीताने विचारले. “तुम्ही पिता गं अशी पेये?” मावशीने प्रश्न केला. “आई आम्हाला अशी पेये पिऊ देत नाही, तरी पण एखादवेळी बाबांजवळ हट्ट करून म्हणजे फार क्वचित पितो आम्ही.” सीताने उत्तर दिले. “पण उसाचा रस, लिंबू सरबत आम्ही बऱ्याचदा स्ट्रॉनेच पितो.” निता म्हणाली.
“उसाचा रस, लिंबू सरबत ही आरोग्याला हितकारक असतात पण सॉफ्ट ड्रिंक्स असे गोंडस नाव दिलेली व चवही गोडस ‘गोड’(बोग)स गोडसट असलेली सगळी पेयं ही त्यामध्ये रसायने असल्याने आरोग्याला अपायकारक असतात तरीही सारेजण ते स्ट्रॉ च्या नळीने मोठ्या आवडीने पितात. स्ट्रॉ ची नळी ही प्लॅस्टिक किंवा कागदापासून बनवलेली असते. तिचे एक टोक पेयात बुडवतात व दुसरे टोक तोंडामध्ये घेतात. जेव्हा स्ट्रॉ च्या नळीने एखादे पेय पितात तेव्हा पिणारा तोंडाने स्ट्रॉच्या साहाय्याने ते पेय ओढून घेत असतो. पेय वर ओढतांना त्याच्या फुप्फुसांचे प्रसरण होते व त्याच्या तोंडातील हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे पर्यायाने नळीच्या वरच्या रिकाम्या भागातील हवेचाही दाब कमी होतो; परंतु नळीच्या आजूबाजूच्या पेयाच्या वरच्या बाहेरच्या मोकळ्या भागावर मात्र जो बाहेरच्या हवेचा दाब असतो तो जास्त असतो. त्यामुळे ते पेय नळीमध्ये ओढले जाते कारण कोणतेही पेय वा द्रव हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे प्रवाहित होत असतो.” मावशीने स्पष्ट केले.
“आणि मावशी पान खाल्ल्याने तोंडाला लाल रंग कसा येतो?” नितानेसुद्धा आपली शंका विचारली. मावशी हसत हसत म्हणाली, “आपण नागवेलीच्या पानाला थोडासा चुना लावतो व त्यावर किंचितसा कात टाकतो. ज्यावेळी आपण पान चावतो त्यापेळी आपल्या तोंडातील लाळ त्या पानात मिसळते. पान, चुना, कात व लाळ या सर्वांचा परस्परांवर परिणाम होतो व पानाचा पर्यायाने जिभेचा व तोंडाचा रंग लाल होतो.”
नेहमीसारखी संध्याकाळ झाली. अंधाराने आपले हातपाय पसरविणे सुरू केले. आईच्या आवाजाने त्यांना आपल्या ज्ञानदायी गोष्टी आवरत्या घ्याव्या लागल्यात. मावशीने सांगणे बंद केले नि सतरंजीवरून उठली. तशा या दोघीही उठल्या, सतरंजीची घडी केली. निताने सतरंजी आपल्या हाती घेतली व त्याही मावशीमागे जिना उतरल्या.
“माझ्या लाडक्या मुलींनो, आज दिवसा आईसोबत जरा जास्त काम उरले. त्यामुळे जरा मला थोडेसे थकल्यासारखे वाटते. तरी आपण आजची चर्चा थांबवू या का?” मावशीने विचारले. “हे काय विचारावे लागते का मावशी? तू आमची मावशी व आम्ही तुझ्या मुली. तू म्हणशील व सांगशील ते आम्ही ऐकूच.” सीता बोलली. “हो मावशी. तू म्हणतेस तसे आपण उद्या संध्याकाळी पुन्हा येऊ गच्चीवर चर्चा करण्यासाठी.” निताने सांगितले. “छान. तशा तुम्ही खूप समजदार आहेत हे मला माहीतच आहे. चला आता आपण खाली जाऊ या.” मावशी बोलली. मग त्या तिघीही मायलेकी उठल्या नि घराच्या जिन्याने खाली उतरू लागल्या.






