देवराई

देवराई ही संकल्पना आता लोकांना नवीन नाही. पण ही संकल्पना फक्त देवाचे राखीव जंगल किंवा देवाचे वन एवढ्यापुरती न राहता अनेक पातळीवर ती वेगवेगळया अंगाने पाहिली जाते.


धार्मिक भावनेतून पवित्र मानलेले उपवन. जगातील निरनिराळ्या संस्कृती असलेल्या समाजाने पवित्र भावनेतून वृक्षांची वाढ करून ते क्षेत्र सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला आहे. भारतातील समाजाने धार्मिक महत्त्व देऊन राखीव ठेवलेल्या लहान-लहान क्षेत्राच्या उपवनास देवराई म्हणतात. देवराई ही वृक्षवाढीसाठी मनुष्याने व्यक्त केलेली कृतज्ञतेची एक भावना आहे.


देवराई ही एक स्वतंत्र परिसंस्था असते. सामाजिक श्रद्धेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या परिसंस्थांचे संरक्षण होते. त्यामुळे वनस्पती आणि प्राणी यांच्या विविध जातींचे संरक्षण होते. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांत देवराया आहेत. बहुतेक देवरायांचे हिंदू, मुस्लीम व बौद्ध धर्म तसेच वेगवेगळ्या आदिवासी गटांमार्फत रक्षण केले जाते. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची उपलब्धता हे देवरायांचे एक वैशिष्ट्य मानले जाते. फळे, फुले, मध, वाळलेले लाकूड इ. गोळा करण्यासाठी देवरायांचा उपयोग होतो. अशा परिसरात निर्वनीकरणास प्रतिबंध असल्यामुळे वृक्षांचे संरक्षण होते आणि मृदेची धूप होत नाही. बहुतेक देवराया या जलाशयाजवळ असतात. त्यामुळे लोकांची पाण्याची गरज भागविण्यास देवराया नकळत उपयोगी पडतात.


या पारंपरिक उपयोगाशिवाय आधुनिक दृष्ट्या या देवराया उपयुक्त आहेत.


देवराया या जैविक विविधतेच्या दृष्टीने समृद्ध असतात. शिकारी व वृक्षतोडीला बंदी असल्याने प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहतो. देवरायांच्या आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा देवरायांमध्ये प्राणी व वनस्पती यांच्या वाढीसाठी अनुकूल पर्यावरण असते. त्यांचे संरक्षण होत असल्याने जनुकीय विविधता राखली जाते.


दुर्मीळ प्राणी आणि अति-दुर्मीळ वनस्पर्तीसाठी आश्रयस्थान म्हणून जंगले काम करतात; परंतु लोकसंख्येचा स्फोट, शेतीचे व्यापारीकरण आणि वाढती जंगलतोड हे अनेक देवराईंच्या मुळाशी आले आहे. पण, देवराईचे योग्य संवर्धन आणि संरक्षण धोरण आवश्यक आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट लोकप्रिय झाला, पण या चित्रपटातील उत्सव हा वनाचे रक्षण करणाऱ्या स्थानिक देवतांवर आधारित आहे. हीच ती देवराई. देवराई या ग्रामदेवता या संकल्पनेशी संबंधित असतात. मोठ्या संख्येने, विभिन्न स्थानिक कला-प्रकार आणि लोक-परंपरा देवराईच्या देवतांशी संबंधित आहेत.


सनातन, बौद्ध, जैन आणि शीख धर्म यांसारख्या भारतीय वंशाच्या अनेक धर्मामध्ये देवराईला यात्रेचे ठिकाण मानले जाते. देवराईची जंगले बऱ्याचदा मंदिरे, मठ, तीर्थक्षेत्रे, स्मशानभूमीशी संबंधित आढळतात. अनेक समाजांत निसर्गाचा परंपरेने आदर, पूजा केली जाते. काही वनस्पती आणि प्राण्यांना पवित्र मानले जाते, इतकेच नव्हे तर जंगलाच्या काही भागाला स्थानिक लोक ‘पवित्र’ मानतात, म्हणूनच या जंगलांना ‘संरक्षण’ मिळालेले आहे.


देशातील ही ‘देवराई’ नावाने ओळखली जाणारी जंगले धार्मिकदृष्ट्या संरक्षित आहेत आणि त्यांचे संरक्षण करणाऱ्या समुदायासाठी त्यांचे धार्मिक महत्त्व असते. अशा जंगलांमध्ये शिकार करणे आणि लाकूड तोडण्याला मनाई आहे. मथ किंवा वाळलेली, पडलेली लाकडे गोळा करणे यांना परवानगी मिळते; परंतु अशा वनांचे संरक्षण करण्यासाठी स्वयंसेवी संस्था स्थानिक गावकऱ्यांसोबत काम करतात.


पारंपरिकपणे आणि काही प्रकरणांमध्ये आजही समुदायाचे सदस्य गस्त घालून या देवराईचे संरक्षण करतात. वन्यजीव (संरक्षण) अमेंडमेंट कायदा, २००२ अंतर्गत, ‘देवराई’सारख्या जंगलांना सरकारी संरक्षण दिलेले आहे.


राज्यात सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, विंझाई, म्हसोबा, सोनजाई, आंबेश्वर अशा अनेक देवांच्या नावाने त्या-त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भवतालचा परिसर तेथील आदिवासी, गावकरीच जतन करत असतात. राज्यात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आहेत. या देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी आहे.


कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत मिळून सुमारे २,५०० देवरायांची नोंद आहे. त्यापैकी १६०० सिंधुदुर्गात, तर उर्वरित रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. या जिल्ह्यांत जवळजवळ प्रत्येक गावात एक किंवा दोन देवराया आहेत आणि सुमारे नऊशे ते हजार वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. त्यापैकी शंभराहून जास्त दुर्मीळ आणि लुप्त वनस्पती यातील बऱ्याच देवरायांमध्ये आहेत.

Comments
Add Comment

दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्ती

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे दोन विषयांनी माणसाची शक्ती जागृत होते. दृढ निश्चय व दुर्दम्य इच्छाशक्तीने माणूस

सुगंध कर्तृत्वाचा

स्नेहधारा : पूनम राणे इयत्ता आठवीचा वर्ग. वर्गात स्काऊट गाईडचा तास चालू होता. अनघा बाई परिसर स्वच्छता आणि

स्त्रीधन

क्राइम : अॅड. रिया करंजकर समाजामध्ये नजर टाकली, तर लग्न टिकवण्यापेक्षा घटस्फोटाचे प्रमाण वाढत असलेले दिसून येत

अच्छा लगता हैं!...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे आपण नेहमी आपल्याला आवडलेल्या गाण्यांना ‘जगजीत सिंगची गझल’, ‘चित्रा सिंगची

क्षमा आणि शिक्षा...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर संत एकनाथांच्या बाबतीत असं सांगतात की एकदा एकनाथ महाराज नदीवरून स्नान करून येत असताना

तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर : दगडात कोरलेला वास्तुग्रंथ

विशेष : लता गुठे भारतात अनेक राज्यांमध्ये हजारो वर्षांपासून काही ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आजही