Saturday, December 13, 2025

तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर : दगडात कोरलेला वास्तुग्रंथ

तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर :  दगडात कोरलेला वास्तुग्रंथ

विशेष : लता गुठे

भारतात अनेक राज्यांमध्ये हजारो वर्षांपासून काही ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आजही सुस्थितीत उभ्या आहेत. यापैकी बहुतेक पूर्णपणे दगडांचा वापर करून बांधलेल्या आहेत. त्या वास्तू फक्त वास्तूच नाहीत तर त्या अध्यात्म, संस्कृती आणि शिल्पकलेचा सुरेख संगम त्यामधून आढळतो. त्या विज्ञानाच्या भक्कम पायावर उभ्या आहे. या वास्तूंची रचना वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे भारतीय उज्ज्वल इतिहासाची साक्ष देतात. त्या वस्तूची रचना, कलात्मकता, इतकी सुंदर असते की पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. आज अशाच एका वास्तूविषयी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे.... या मंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेला आहे.

अनेक आश्चर्यापैकी एक असलेले तंजावर येथील भुवनेश्वर मंदिर. या मंदिराला बृहदेश्वर असेही म्हणतात. या लेखामध्ये या मंदिराचा इतिहास, कला-संस्कृती, धार्मिक व सामाजिक महत्व याविषयी वर्णन केले आहे. तसेच शिल्पकलेच्या अंगाने शास्त्रीयपणे विचार करून मांडणी केली आहे. या मंदिराविषयी अनेक ठिकाणी ऐकले होते, वाचले होते त्यामुळे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. मिळालेल्या माहितीवर आधारित हा लेख आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर—ज्याला ‘राजराजेश्वर’ तसेच ‘भुवनेश्वर मंदिर’ असेही संबोधले जाते—हे एक वैश्विक वारसा आहे. इ.स. १०१० च्या दरम्यान चोल सम्राट प्रथम यांनी उभारलेले हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टीनेच नव्हे तर कला, विज्ञान, स्थापत्य आणि सामाजिक संस्कृती याचा सुरेख संगम आढळतो. द्रविड वास्तुशैलीचा वापर करून बांधलेले बृहदेश्वर मंदिर आजही जगभरातील अभ्यासकांना, कलाप्रेमी व इतिहास संशोधकांना आकर्षित करत आहे.

चोल साम्राज्याच्या सुवर्णकाळाची साक्ष देणारे हे मंदिर आहे. चोल वंश हा दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन व प्रभावी राजवंशांपैकी एक होता हे आपण जाणतोच आहोत. राजाराज–प्रथम (इ.स. ९८५–१०१४) यांच्या काळात चोल साम्राज्याचा विस्तार दख्खनपासून श्रीलंका व बंगालच्या किनाऱ्यापर्यंत झाला होता. या विशाल सत्तेचा पराक्रम नोंदवण्यासाठी तसेच साम्राज्याची सांस्कृतिक ओळख दृढ करण्यासाठी राजराजांनी तंजावर येथे विशाल शिवमंदिर उभारण्याचा संकल्प केला कारण शिव हे चोलांचे कुलदैवत असल्यामुळे साम्राज्याच्या सर्व प्रदेशांमध्ये धार्मिक एकात्मता निर्माण करण्यासाठी त्यांनी गावोगावी शिवालये बांधली.

बृहदेश्वर हे मंदिर अतिशय भव्य-दिव्य स्वरूपात उभे केले. त्यामागची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे चोल सैन्याच्या विजयगाथांचं स्मारक म्हणून या मंदिराचा उपयोग त्यांनी केला. दुसरे कारण म्हणजे कृषी, व्यापार व सामाजिक रचनेच्या स्थैर्यासाठी देवालय हे आर्थिक केंद्र बनवले. मंदिर हे पवित्र विचारांचे ठिकाण असल्यामुळे व तिथे सकारात्मक ऊर्जा मिळते या सर्व कारणांमुळे बृहदेश्वर मंदिर केवळ धर्मस्थळ न राहता राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू बनले. अनेक कारणांसाठी बनवलेले हे मंदिर दुहेरी प्राकार प्रणालीमुळे मंदिर गावाच्या संरक्षक किल्ल्यासारखे वाटते. बृहदेश्वर म्हणजे महादेव किंवा महाशिव. शिव हे आदिशक्तीचे प्रतीकही मानले जाते. सर्वसामान्य लोकांमध्ये भुवनेश्वर नावाने प्रचलित असलेले मंदिर म्हणजेच ‘भुवनांचा ईश्वर’ ही संकल्पना प्रतिबिंबित होते.

मंदिराची रचना अशी आहे, मंदिर पूर्वाभिमुख असून अत्यंत सुबक रचना असल्यामुळे त्यामध्ये अतिशय कल्पकता आढळते. मंदिराच्या प्रत्येक भाग कलात्मक तर आहेच तसेच वैशिष्ट्यपूर्णही आहे. हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा ग्रंथच म्हणावा लागेल. संपूर्ण ग्रॅनाइट दगडाचा वापर करून हे भव्य- दिव्य मंदिर बांधले आहे. अनेक किलोमीटर अंतरावर पसरलेले हे मंदिर पाहणाऱ्यांना विचार करायला लावते. मंदिराचे शिखर ६६ मीटर उंच असून भारतातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. यासाठी वापरलेला एकसंध ग्रॅनाइटचा कळस–शिखर सुमारे ८० टन वजनाचे आहे असे म्हटले जाते. या कळसाकडे पाहताना नकळत पहाणाऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, इतक्या मोठ्या प्रचंड दगडाला इतक्या उंचीवर कसे नेले असेल? याविषयी असेही वाचायला मिळते की ६ किमी लांब उतार बनवून हत्तींंच्या साहाय्याने शिखर उचलण्यात आले असावे.

प्रवेशद्वारामध्ये मुखमंडप आहे त्याला नंदीमंडप असेही म्हणतात येथे असलेली नंदीची मूर्ती सुमारे २५ टन वजनाची व एकाच दगडातून घडवलेली आहे. मंदिरात शिवलिंग असलेले गर्भगृह आहे. हे शिवलिंग ‘बृहदेश्वर’ नावाने ओळखले जाते. शिवलिंगाची उंची सुमारे ४ मीटर असून दक्षिण भारतातील मंदिरामध्ये जे शिवलिंग आहेत त्यापैकी सर्वात मोठे हे शिवलिंग आहे. संपूर्ण मंदिराची रचना ही उत्कृष्ट चोल कलाशैलीचे सर्वोच्च रूप मानले जाते. यामुळेच तेथील चोल राज्यातील कलाकार सुरेख, जिवंत कला निर्मितीसाठी जगप्रसिद्ध होते. मंदिराच्या भिंतींवर देव–देवतांचे समूह, नर्तक, संगीतकार, गण, शैव पुराणातील प्रसंग यांचे शिल्प अत्यंत सूक्ष्मतेने रेखांकित केले आहेत.

शिवाचा नटराज रूप चोलकलेचे महत्त्वाचे प्रतीक. बृहदेश्वराच्या शिल्पांमध्ये नटराजाची भावविभोर मुद्रा, हाता-पायांच्या हालचाली, लयबद्धता आणि अाध्यात्मिक ऊर्जा अप्रतिमपणे साकारलेली दिसते.

शिल्पांमधील अनुपात, दृष्टिमान सममिती आणि गणिती प्रमाण चोलांच्या वास्तुविद्येचे उत्कृष्ट दर्शन घडवते आहे. अनेक शिल्पांवर नृत्यांची ‘१०८ प्रकार कोरलेली आहेत, जी भरतनाट्यम व नाट्यशास्त्राच्या अभ्यासासाठी अमूल्य आहेत.

मंदिराच्या अंतर्भागातील भित्तिचित्रे आजही भारतीय प्राचीन चित्रकलेचे सर्वोच्च उदाहरण मानली जातात. यामध्ये शिव–पार्वती, चोल राजांचे दैनंदिन जीवन, समारंभ, नवरात्र, अर्चनाविधी, दारूका वध, अंधकासूर मर्दन यांसारख्या पुराणकथा चित्रीत केलेल्या आहेत. ही चित्रं अतिशय सौम्य रंगांमध्ये नाजूकशा, रेषांनी अविष्कृत केलेली आहेत. इ.स. १००० च्या सुमारास रंगविलेले हे भित्तिचित्रं आजही प्रयोगशील कलांच्या दृष्टीने अद्भुत आहेत. अनेक धार्मिक सांस्कृतिक संकेत या मंदिराच्या आवारात आढळतात यापैकी शैव सिद्धांतानुसार शिव हा ‘विश्व–नियंता’, ‘अनंत’ आणि ‘नटराज’ या तीन रूपांनी प्रकट होतो. बृहदेश्वराचे स्थापत्य याच रूपसंकेतांवर प्रकाश टाकते.

हे मंदिर पाहताना त्याकाळी चोल यांच्या साम्राज्यामध्ये देवपूजा, संगीत, नृत्य व वेदपठण तसेच आर्थिक व्यवहार, शेती, जलव्यवस्थापन यांचे नियमन याला किती महत्त्वाचे स्थान होते तसेच नंदी मंडपातील ध्वनी–प्रतिध्वनी आजही अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतात. हे आपल्या लक्षात येते. नृत्य कला चित्रकला शिल्पकला या कलाही त्या काळामध्ये किती प्रगत होत्या याचे हे जिवंत उदाहरण पाहायला मिळते. अशाप्रकारे अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले हे मंदिर पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहे.

Comments
Add Comment