Sunday, December 14, 2025

ऑस्ट्रेलिया : सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान गोळीबार, १० जणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलिया : सिडनीत हनुक्का उत्सवादरम्यान गोळीबार, १० जणांचा मृत्यू

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बोंडी बीचवर (समुद्रकिनारा) ज्यू नागरिक हनुक्का उत्सव साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दहा नागरिकांचा मृत्यू झाला. एका माणसानं धाडस करुन दोन हल्लेखोरांपैकी एकाला निःशस्त्र केलं. हाती आलेल्या माहितीनुसार सिडनीतील घटनेत एका हल्लेखोराचा मृत्यू झाला आणि एका हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काळे कपडे परिधान केलेल्या दोन हल्लेखोरांनी बोंडी बीचवर उपस्थित नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. बीचवर हनुक्का उत्सव साजरा होत होता. मोठ्या संख्येने ज्यू नागरिक होते. हल्लेखोरांनी या ज्यू नागरिकांवर गोळीबार केला. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातल्याच एका व्हिडीओत एक धाडसी माणूस दिसत आहे. या माणसानं धाडस करुन दोन हल्लेखोरांपैकी एकाला निःशस्त्र केलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धाडसी व्यक्तीचे कौतुक होत आहे.

हल्लेखोरांपैकी एकाची ओळख पटली

गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाचे नाव नावीद अक्रम असे आहे. हल्लेखोराकडे नावीद या नावाने एक वाहन परवाना होता. हा परवाना स्थानिक पोलिसांनी आता जप्त केला आहे.

थोडक्यात जाणून घ्या सिडनीतील धक्कादायक घटनेची माहिती

  1. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बोंडी बीचवर ज्यू नागरिक हनुक्का उत्सव साजरा करत असताना दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी ५० फैरी झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
  2. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका आणि पोलिसांचा मोठा ताफा
  3. हल्लेखोरांनी त्यांच्याकडे असलेल्या आधुनिक शस्त्राचा वापर करुन अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आणि किमान १० जणांचा मृत्यू झाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
  4. बोंडी बीचवर घडलेल्या घटनेची कसून चौकशी होणार, हल्लेखोरांचे मदतनीस असल्यास त्यांना शोधून काढून अटक करणार असल्याचे ऑस्ट्रेलिया सरकारने जाहीर केले.
  5. भारत, इस्रायलसह अनेक देशांनी ऑस्ट्रेलियातील घटनेची माहिती मिळताच शोक प्रकट केला. भारत सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशातील ज्यू नागरिकांना स्वतःची काळजी घ्या आणि जवळच्या पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहा तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना माहिती द्या; असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment