Sunday, December 14, 2025

मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन

मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षी उद्यानाचे भूमिपुजन

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय भागात नागरिक आणि पर्यटकांसाठी, पर्यटनाचा नवा आणि आकर्षक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मुलुंड (पश्चिम) परिसरातील नाहूर येथे अत्याधुनिक ‘विदेशी पक्षी उद्यान’ उभारण्यात येणार आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पक्षीगृह उभारण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पक्षीगृहाचे भूमिपूजन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्या रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ऑनलाइन होणार आहे. राज इंडस्ट्रियल इस्टेटच्या मागे, डी. पी. रोड, सालपादेवी पाडा, मुलुंड (पश्चिम), मुंबई येथे हा सोहळा होईल.

मुंबई महापालिकेच्या ताब्यातील सुमारे १७,१३९.६४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यापैकी सुमारे १०,८५९ चौरस मीटर क्षेत्रावर विदेशी पक्ष्यांसाठी विशेष पक्षीगृह उभारले जाणार आहे. उर्वरित जागेत तिकीटघर, सार्वजनिक स्वच्छतागृहे, स्मृतिप्रतीके दुकान, कॅफे तसेच भुयारी वाहनतळ (अंडरग्राउंड पार्किंग) आदी सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या पक्षी उद्यानामुळे नागरिकांमध्ये पक्षी, प्राणी आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती वाढण्यास मदत होणार असून, महानगरपालिकेच्या महसुलातही भर पडणार आहे, असे उपायुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांनी सांगितले.

या पक्षी उद्यानाची रचना ही वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील आधुनिक पक्षीगृहाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय भागातील तसेच मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना हा नवा पर्यटन पर्याय उपलब्ध होणार आहे. या विदेशी पक्षी उद्यानामध्ये २४ स्वतंत्र अधिवास प्रस्तावित आहेत. जगभरातील दुर्मिळ व रंगीबेरंगी पक्ष्यांचे दर्शन येथे घडणार आहे. पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाची अनुभूती देणाऱ्या प्रशस्त आणि सुरक्षित पक्षीशाळांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हे पक्षी उद्यान केवळ पर्यटन केंद्र न राहता, जैवविविधता व पक्षी संवर्धनाविषयी जनजागृती करणारे शाश्वत पर्यावरण-शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यासोबतच चित्रपट व छायाचित्रण, जाहिरात, कॉर्पोरेट प्रायोजकत्व, पक्षी व बाग दत्तक योजना, स्मृतिप्रतीके दुकान व उपाहारगृह (रेस्टॉरंट) भाड्याने देणे अशा विविध माध्यमांतून महसूल निर्मितीची योजना राबवून प्रकल्प स्वयंपूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याचे संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

दुर्मिळ प्रजातींचा समावेश

या पक्षी उद्यानामध्ये ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन, अमेरिका आणि विशेष तितर क्षेत्र अशा विषयाधारित जागतिक विभागांची संकल्पना राबवली जाणार आहे. यामध्ये गलाह कॉकॅटू, एक्लेक्टस पोपट, सन कॉनूर, गोल्डन कॉनूर, सेनेगल पोपट, जार्डिन पोपट, शहामृग, टोको टूकान, स्कार्लेट मकाऊ, गोल्डन व सिल्व्हर फीझंट आदी तेजस्वी आणि दुर्मिळ प्रजातींचा समावेश असेल.

पक्ष्यांच्या नैसर्गिक वर्तनाला आणि संवर्धनाला हातभार

प्रत्येक पक्ष्याच्या नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत अशी स्वतंत्र संलग्नके उभारण्यात येणार आहेत. यामुळे पक्ष्यांच्या नैसर्गिक वर्तनाला चालना मिळेल आणि संवर्धनाला हातभार लागेल. तसेच पक्ष्यांसाठी स्वतंत्र रुग्णालय, विलगीकरण (क्वारंटाईन) क्षेत्र, ‘बर्ड किचन’ आणि अंतर्गत सेवा रस्त्यांसह पशुवैद्यकीय व देखभाल पायाभूत सुविधाही देण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment