मंत्री अदिती तटकरे; ३१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक
नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी अंतिम आणि एकमेव संधी देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, ही सुधारणा प्रक्रिया ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
योजनेच्या बहुतांश लाभार्थी दुर्गम आणि ग्रामीण भागातील असल्याने ई-केवायसी करताना चुका होणे स्वाभाविक आहे. अशा चुका दुरुस्त करण्याबाबत विभागाकडे अनेक निवेदने प्राप्त झाली होती. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या योजनेत लाभार्थींना संधी देणे गरजेचे असल्याने, ई-केवायसीमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
तसेच, पती किंवा वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांना ई-केवायसी प्रक्रिया स्वतः पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून या महिलांना योजनेचा लाभ सुरळीत मिळावा, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी करण्याबरोबरच जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले. लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली… pic.twitter.com/nT4Pw6E2QP — Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 13, 2025






