Saturday, December 13, 2025

तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड

तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड

कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या आगमनामुळे फुटबॉल वेड्या कोलकात्यात उत्साहाचं वातावरण होतं आणि त्याला पाहण्यासाठी हजारो चाहते सॉल्ट लेक स्टेडियममध्ये उपस्थित होते. मात्र, मेस्सीच्या प्रत्यक्ष उपस्थितीदरम्यान अवघ्या काही मिनिटांतच परिस्थिती हाताबाहेर गेली आणि कार्यक्रम अर्धवट थांबवावा लागला.

सकाळी ११.३० वाजता मेस्सी स्टेडियममध्ये पोहोचला. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही मेस्सी मैदानात येताच चाहत्यांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी स्टँडचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला, तर मेस्सी बाहेर पडताच प्रेक्षकांमध्ये संताप उसळला. केवळ १० मिनिटे स्टेडियममध्ये थांबल्याने नाराज झालेल्या चाहत्यांनी बाटल्या फेकण्यास सुरुवात केली आणि फायबरग्लासच्या खुर्च्यांची तोडफोड केली.

परिस्थिती गंभीर होताच ‘GOAT Tour’चे आयोजक व प्रवर्तक शतद्रु दत्ता यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने मेस्सीला तात्काळ स्टेडियममधून बाहेर काढले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी धावपळ उडाली. यावेळी ४५०० ते १०००० रुपयांपर्यंतची तिकीटे काढलेल्या अनेक चाहत्यांचा संताप उफाळून आला.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

 

एका चाहत्याने सांगितले की, मेस्सीला पाहण्यासाठी अनेकांनी महिन्याचा पगार खर्च केला आहे. मात्र, प्रत्यक्षात एक झलकही पाहायला मिळाली नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती आणि व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही चाहत्यांनी केला. दरम्यान, लेक टाऊनमधील श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबने उभारलेल्या ७० फूट उंच लोखंडी पुतळ्याचे मेस्सीने अनावरण केले. या वेळी त्याने अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा अबराम यांची भेट घेतली. मात्र, स्टेडियममधील गोंधळामुळे शाहरुख खान, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले.

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी GOAT Tour चे आयोजक शतद्रु दत्तला ताब्यात घेतले आहे. तसेच तिकीट काढलेल्या सर्व चाहत्यांचे पैसे परत केले जातील, असे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकारी जावेद शामिम यांनी दिले आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांची आणि क्रीडाप्रेमींची माफी मागितली. सॉल्ट लेक स्टेडियममधील गैरव्यवस्थापनामुळे आपल्याला धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment