रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार
मुंबई : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची तयारी करत आहे. या दरम्यान, मागील हंगामातील फायनलिस्ट असलेल्या पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर लिलावात सहभागी होणार आहे. अय्यरने आता मजबूत संघ तयार करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र, या वेळी पंजाब किंग्सला त्यांचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांची कमतरता जाणवणार आहे, कारण त्यांनी मिनी लिलावातून स्वतःला बाजूला केले आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा दिग्गज (डॅनियल व्हिटोरी) मात्र आपल्या संघाला सोडत नाही.
रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२६च्या मिनी लिलावात पंजाब किंग्सच्या टेबलवर कर्णधार श्रेयस अय्यर दिसण्याची शक्यता आहे. अय्यर सध्या पूर्णपणे फिटनेस मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि याच कारणामुळे तो टेबलवर उपस्थित राहू शकतो. पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग मात्र टेबलवर दिसणार नाहीत.
पाँटिंग सध्या ‘द ॲशेस २०२५-२६’ मध्ये कॉमेंट्री करत आहेत. तिथून त्यांना रिलीज केले जाणार नाही. त्यामुळे ते ऑस्ट्रेलियातूनच आपल्या संघाला मदत करतील. लिलावाच्या वेळी एका संघाच्या टेबलवर फक्त ८ सदस्यच उपस्थित राहू शकतात. त्यामुळे सर्व फ्रँचायझी या सदस्यांची यादी आधीच बीसीसीआयला पाठवतात. ऑस्ट्रेलिया संघासोबत जोडलेले डॅनियल व्हिटोरी (सनरायझर्स हैदराबादचे कोच) मात्र या लिलावात उपस्थित राहतील. त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाशी याबद्दल चर्चा केली आहे. सनरायझर्स हैदराबादने मागील हंगामात फार चांगली कामगिरी केली नव्हती. त्यामुळे व्हिटोरी या वेळी टेबलवर बसून मागील हंगामातील चुका सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.






