Sunday, January 18, 2026

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडी यावर राज्य सरकारने आज विधान परिषदेत ठोस भूमिका मांडली. तांत्रिक अडचणी आणि परवानग्यांचे अडथळे दूर करून मार्च २०२६ पर्यंत ठाणे-भिवंडी टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आमदार सत्यजित तांबे आणि हेमंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री मेघा बोर्डीकर आणि मंत्री उदय सामंत यांनी सरकारची 'विकासनीती' स्पष्ट केली.

भिवंडीसाठी 'विशेष' नियोजन: १० एकर जागा आणि उन्नत मार्ग

भिवंडी आणि ठाणे परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेता सरकारने केवळ रस्ता न बनवता, तेथील ट्रॅफिक नियोजनासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री मेघा बोर्डीकर यांनी माहिती दिली की, "भिवंडी परिसरात वाहतुकीची समस्या उद्भवू नये म्हणून सरकार १० एकर जमीन अधिग्रहित करत आहे. तसेच, येथील उन्नत मार्ग हा काही ठिकाणी भूमिगत असणार असून तो थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. हे संपूर्ण काम आधुनिक ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमसह २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे."

विरोधकांच्या शंकांचे निरसन; काम वेगाने सुरू

आमदार सत्यजित तांबे यांनी कामाच्या टक्केवारीबाबत (७५% की ९६%) उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकारने तांत्रिक बाजू स्पष्ट केली. हे काम आधी 'एनएच एआय' (NHAI) कडे होते, परंतु २०२१ मध्ये ते 'एमएसआरडीसी'कडे (MSRDC) आले आणि प्रत्यक्षात २०२२ मध्ये कामाला सुरुवात झाली. त्यामुळे जुन्या आकड्यांमध्ये तफावत वाटत असली तरी, सध्या एमएसआरडीसीच्या माध्यमातून काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सरकारने सांगितले.

३२ किमीचा अडथळा दूर करणार: उदय सामंत

समृद्धी महामार्गाचा ७०० किमीचा पट्टा पूर्ण झाला असताना, केवळ ३२ किमीचे काम एका राजकीय वजन असलेल्या कंत्राटदारामुळे रखडल्याचा गंभीर मुद्दा आमदार हेमंत पाटील यांनी मांडला. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेत, सरकार कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले. "हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक लावून हा ३२ किमीचा तिढा सोडवला जाईल आणि काम पूर्ण केले जाईल," अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

वरळी-शिवडी प्रकल्प आणि पुनर्वसन

आमदार सुनील शिंदे यांनी वरळी-शिवडी कोस्टल रोड आणि बाधित इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला. यावर मंत्री उदय सामंत यांनी सरकारची संवेदनशील बाजू मांडली. बाधित चार कुटुंबांना आर्थिक मोबदला दिला असून, उर्वरित रहिवाशांना त्यांच्या हक्काची 'म्हाडा'ची घरे देऊन त्यांचे सन्मानाने पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. लोअर परळ आणि लालबागला जोडणाऱ्या मार्गाचे कामही गतीने केले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले.

सभागृहात खमंग चर्चा आणि हास्यकल्लोळ

विकासाच्या गंभीर चर्चेदरम्यान आज विधान परिषदेत काही हलकेफुलके क्षणही पहायला मिळाले. आमदार प्रसाद लाड यांनी एका संदर्भात बोलताना, "मला करंट लागला तर राज्याचे नुकसान होईल," असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. दुसरीकडे, मंत्री उदय सामंत यांच्यावर बोलताना, "सामंत हे मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत?" असा प्रश्न उपस्थित होताच, सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांना उद्देशून "तुम्ही वरळीच्या आमदाराचे (आदित्य ठाकरे) किती लाडके आहात, हे आधी बघा," अशी कोपरखळी मारण्यात आली. या जुगलबंदीने सभागृहातील वातावरण काही काळ हलकेफुलके झाले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >