Friday, December 12, 2025

हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!
प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या 'बोलविता धनी' या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात अभिनेता क्षितीश दातेने दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो सांगतो की, "या दोन्ही भूमिका एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगळी माणसं एकापाठोपाठ एक उभी करणं हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे. नाटक दोन काळांमध्ये चालत राहतं आणि नाटकाच्या नावाप्रमाणे 'बोलविता धनी' या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने नाटकात लागतो. क्षितीशच्या मते, ही संकल्पना कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसली तरी, "बोलविता धनी म्हणजे बोलणारा किंवा कृती करणारा एक असतो, पण पडद्यामागे राहून त्याला सूचना देणारा दुसराच कोणी असतो." विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत त्याने साकारलेल्या लोकमान्य टिळक, एकनाथ शिंदे यांसारख्या नेतृत्वादी व्यक्तिरेखांच्या तुलनेत या नाटकात त्याची भूमिका कनिष्ठ पदाची आहे, पण एक अभिनेता म्हणून हेच आव्हान अधिक रंजक असल्याचं तो मानतो. 'बोलविता धनी' नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग १३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे तर मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे.
Comments
Add Comment