Thursday, December 11, 2025

मुंबईतील पूर्व उपनगरातील ८ नाल्यांवर ट्रॅश बूम

मुंबईतील पूर्व उपनगरातील ८ नाल्यांवर ट्रॅश बूम

उर्वरीत ८ नाल्यांवर सीएसआर निधीतून बसवणार ही प्रणाली

मुंबई : उपनगरामधील विविध नाल्यांतील तरंगता कचरा जमा करणे, बाहेर काढणे व त्याची विल्हेवाट लावण्याकरीता ट्रॅश बुमसहित तराफा आरुढ कचरा वाहक प्रणालीचा बसवण्यात आली आहे. परंतु मुंबईत १६ ठिकाणी या प्रणालीचा वापर करण्यात येणार होता, पण प्रत्यक्षात ८ ठिकाणीच याचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरीत ठिकाणी सीएसआर निधीतून ही प्रणाली बसवण्यात येत आहे. त्यामुळे यावर होणारा महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला गेला आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी ऑक्टोबर २०२० रोजी पारित केलेल्या आदेशात मुंबई महानगरपालिकेला खारफुटीचा भाग प्लास्टिक मुक्त ठेवण्याकरिता नाले आणि नद्यांमधील तरंगता कचरा वाहून समुद्रात थेट जाण्यापासून रोखण्याकरीता योग्यती कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच तरंगता प्लास्टिक व इतर कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लावण्याकरिता ट्रॅश बुम बसविण्याची शिफारस केलेली होती.

त्या अनुषंगाने पुर्व उपनगरातील एकुण १६ नाल्यांमधील तरंगता कचरा जमा करणे, बाहेर काढणे व त्याची विल्हेवाट लावण्याकरीता ट्रॅश बुमसहित तराफा आरुढ कचरा वाहक प्रणाली बसवणे आणि त्याचा पुढील ०५ वर्षांची देखभाल करणे करणे यासाठी निविदा मागवून कंत्राटदारांची निवड केली. पण या१६ ठिकाणी ट्रॅश बुम बसविण्याऐवजी आवश्यकतेनुसार ८ ठिकाणी ट्रॅश बुम प्रणाली कंत्राटदार व्हर्गो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बसवण्यात आली. यासाठी ४३.८९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार पूर्व उपनगरातील बॉम्बे ऑक्सिजन नाला, पंत नगर नाला, ब्राऊंड्री नाला, नानेपाडा नाला, मानखुर्द नाला, वाशीनाका नाला आणि सोमय्या नाला आदी ठिकाणी या ट्रॅश बूमचा वापर करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १६ ठिकाणी ट्रॅश बूम बसवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कंत्राट मंजूरीच्या वेळी या कामाचे स्वरुप कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ८ ठिकाणी या ट्रॅशबूमचा वापर केला गेला आहे. त्यानुसार आता सीएसआर निधीतून सुभाष नगर नाला, राहुल नगर,माहुल खाडी आदी ठिकाणी ट्रॅशबूम बसवण्यात आले असून उर्वरीत ठिकाणीही बसवण्याचा विचार सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हे ट्रॅशबूमचे तंत्रज्ञान नवीन असल्याने तसेच प्रथमच याचा वापर केला जात असल्याने याचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आय आय टी मुंबई) यांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment