Thursday, December 11, 2025

पुरुषार्थ

पुरुषार्थ

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य

पुरुषार्थ हा प्रत्येकामध्ये असतो. तो जागृत करून योग्य पराक्रम गाजवता आला पाहिजे. प्रतिकूल परस्थिती अनुकूल करण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करणं म्हणजे पुरुषार्थ जागृत करणं. आव्हान स्वीकारत राहा. आव्हान जितकं मोठं पुरुषार्थ तितकाच मोठा असतो. आपण स्वीकारलेलं आव्हान आपला पुरुषार्थ ठरवत असतो. अडचणींवर मात करत पराक्रम निर्माण करण्याचा पुरुषार्थ अर्जित करता आला तर जीवन यशस्वी होतं. आयुष्य म्हटलं की, अनेक संकटं, समस्या, वारंवार येणार यात शंका नाही. परिवर्तन स्वीकारणे गरजेचे आहे.

कोणतीही एक स्थिती कायम टिकत नाही. ज्याप्रमाणे जीवनात सुख आणि दु:ख हे वेगवेगळ्या पातळ्यांवर येत असतात त्याप्रमाणेच परिवर्तनाचे आहे. आपल्याकडील ज्ञानाचा योग्य तिथे वापर करता आला पाहिजे. संकटं ही उत्तम संधी समजून त्याप्रमाणे यशस्वी कार्य करणे म्हणजे यशस्वी जीवन म्हणता येईल. वास्तविक निसर्गच आपल्याला घडविण्यासाठीच आपल्यासमोर वेगवेगळी संकटं उभारत असतो. यातून आपल्याला त्याला दु:खी किंवा कमजोर करणे हा त्याचा हेतू नसून आपल्याला मानसिकरीत्या सक्षम करणे हाच असतो. आपला पुरुषार्थ दुबळा असेल तर आपण याला नकारात्मक स्वीकारतो. म्हणूनच आपण संकट, समस्या यांना घाबरतो. तणावग्रस्त होतो, निराश होतो. खरी समस्या इथंच आहे. न घाबरता, न दुःखी होता, न ताणतणाव घेता, चिंता न करता जीवनातील कोणतंही संकट हे आपल्याला रडविण्यासाठी नाही, तर साहजिकच आपल्याला घडविण्यासाठी आलेलं असतं. हा विचार घेऊन आपला पुरुषार्थ जागृत करणं खूप महत्त्वपूर्ण आहे.

ज्यांनी संकटाला आपले मानले त्यांनी आपल्या जीवनात संकटाला उत्तम संधीत परिवर्तित केले. असे म्हणतात की, दुःखानंतर सुख येते, सुखानंतर दुःख हे जीवनचक्र चालूच राहते, त्यामुळे सुख जरी आले तरी हुरळून जाऊ नये. त्याचप्रमाणे दुःख आले तरी सुख येणारच आहे हा विश्वास मनात ठेऊन त्या दुःखावर, संकटावर मात करून मार्गक्रमणा करावी. आपण लहान-सहान समस्या, संकटे आली तरी तणाव घेतो. त्यावर मात करीत पुढे जाणे हेच जास्त श्रेयस्कर ठरते. देवाने एक दरवाजा बंद केला की, तो दुसरा दरवाजा उघडतोच. त्यामुळे हे दु:ख, समस्या, संकट हे काही काळासाठी आहे याची रुजवणूक मनाशी होणे गरजेचे आहे. म्हणूनच पुरुषार्थाचे बळ अर्जित करता आलं तर अनेक दुःख, समस्या आपोआप नष्ट होतात. संकटं समस्या ही प्रत्येकाला आहेत. किंबहुना ती येणारच मात्र अडचण समस्या आणि संकट याचे स्वरूप व्यक्तिपरत्वे वेगळं असतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती ते संकट कशाप्रकारे हाताळतो तेही महत्त्वाचे असते. ज्याचे जितके ज्ञान, क्षमता, समज त्याप्रमाणे पुरुषार्थ निर्धारित होत असतो.

आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्ञानसाठा किती उपलब्ध आहे, यावरून त्या संकटाचा सामना करण्याची ताकद, शक्ती, क्षमता निर्माण होणारा पुरुषार्थ निर्धारीत होत असते. जितके जास्त ज्ञान तितके त्या संकटांना, समस्यांना भेदण्याची क्षमता जास्त. त्याचप्रमाणे त्याला मानसिक क्षमता ही योग्य असणे गरजेचे असते. म्हणून संकट मोठं आहे की, लहान हे आपल्या ज्ञानावर व मानसिक क्षमतेवर ठरते आणि याला भेदण्याचं कार्य पुरुषार्थ करतो. संकटाला निसर्गाचे निमंत्रण समजून आपल्याकडील ज्ञानाचा उचित उपयोग करा. संकटांना न घाबरता धैर्याने पुढे गेले पाहिजे. संकटे आली की आपले कोण, परके कोण संकटातही आपल्या पाठीशी कोण उभे राहते ते समजते. पुरुषार्थ निर्माण करत संकटाला उत्तम संधीत परिवर्तित करता आलं म्हणजे जीवन यशस्वी झाले. पुरुषार्थ हे सामर्थ्य बळ निर्माण करून जीवन सार्थक करता आलं पाहिजे.

Comments
Add Comment