मनाचा गाभारा : अर्चना सरोदे
स्मरणात जन्मजं पापं दर्शनेन त्रिजन्मजम् ! स्नानात् जन्मसहस्त्राख्यं हन्ति रेवा कलौ युगे !!
अर्थ : जिच्या नुसत्या स्मरणाने पाप नष्ट होते अशा माझ्या रेवा मैय्याच्या चरणी माझे शत शत नमन.
आता तुम्ही म्हणाल नर्मदा मैय्या परिक्रमा विषय चालू असताना ही रेवा मैय्या कोण? तर बऱ्याच जणांना माहितीही असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहीतीसाठी की नर्मदा मैय्याचे एक नाव रेवा असेही आहे. मागील भागात आपण दंड, कमंडलू आणि पारदर्शक बाटली का न्यायची हे जाणून घेतलं. आता आपण परिक्रमेसाठी कोणती तयारी आवश्यक आहे ते पाहूया.
परिक्रमेसाठी शारिरीक पेक्षाही मानसिक तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जर तुमची मानसिक तयारी खंबीर असेल, तर शारिरीक दुःख त्यापुढे गौण आहे. कारण परिक्रमेत अशा बऱ्याच अडचणी येतात ज्यामुळे माणूस खचून जातो आणि मग परिक्रमा अर्धवट सोडली जाते. त्यामुळे मनाची इतकी तयारी झाली पाहिजे की, काही झाले तरी परिक्रमा पूर्ण करणारच आणि अशावेळी संपूर्ण समर्पण आणि भक्तिभावाने मैय्यावर सगळं सोपवून द्यायचं. कारण ती बरोबर आपल्या लेकरांची काळजी घेते आणि लाडही पुरवते. त्यावेळी तुम्हाला वाटत असलेली अडचणही पुढे तुमच्यासाठी तिचा आशीर्वाद, तिने घेतलेली तुमची काळजी यात परिवर्तीत होते. त्यावेळी तुमच्या डोळ्यात फक्त कृतज्ञतेचे भावाश्रु असतात. त्यामुळे मानसिक तयारी फारच गरजेची आहे. शारिरीक तयारीमध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की चालण्याचा सराव करायला हवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन काहींचं म्हणणं असंही असतं की, वजन घेऊन चालण्याचा सराव करायला हवा... पण खरं सांगू का या सगळ्या गोष्टींचा तुम्ही कितीही सराव केलात तरी तुम्ही तितकेच चालता जितकं मैय्या तुम्हाला चालवून घेते. तुम्ही त्याच आश्रमात विश्राम करता जिथे मैय्याची इच्छा असते तुम्हाला थांबवण्याची. म्हणून माझ्या मते म्हणाल तर शारिरीक तयारी पेक्षा मानसिक तयारी आवश्यक आहे. हा पण एक गोष्ट मात्र नक्की केली पाहिजे आपली वैद्यकीय तपासणी जरूर करून घ्यावी. जेणेकरून त्यानुसार गोळ्या औषधे बरोबर ठेवून आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊ. यात तुमचे रक्तदाब, साखर, संधीवात थायरॉइड यांसारखे आजार असल्यास डॉक्टरांशी सल्लामसलत करून त्यावरची औषधे बरोबर ठेवावीत. तसेच पोट गडबड, सर्दी, खोकला, ताप यावरची औषधे तसेच बाम, व्हिक्स, राई किंवा तिळाचे तेल पण बरोबर असू द्यावे. बॅंडेड पट्ट्या, कैलास जीवन (भाजणे, फोड येणे, कात्रे पडणे यासाठी) घ्यावे.
ही झाली औषधे आता बाकी कोणकोणत्या गोष्टी बरोबर घ्याव्यात हे सुद्धा आपण पाहू.
१) सर्व प्रथम आपण जिथे राहतो तिथले सरकारी चारित्र्य प्रमाणपत्र बनवून घ्यावे. हे प्रमाणपत्र अतिशय आवश्यक आहे.
२) एक सॅक घ्यावी. आपल्या उंचीनुसार आणि आपण किती वजन घेणार त्याप्रमाणे ती मोठी असावी. वजन शक्यतो जितके कमी असेल तितके चांगले. तुम्हाला ते उचलून चालणे सोपे जाते.
३) एक शबनम असावी ज्यात आपलं जरुरी सामान ठेऊ शकतो. आपल्याला गरज पडताच ते काढता येऊ शकते.
४) महिलांनी दोन जोडी पांढऱ्या साड्या किंवा पंजाबी ड्रेस, एक स्कर्ट अथवा परकर, एक पंचा आणि पुरुषांनी दोन पांढऱ्या लुंगी, बंडी बरोबर घ्यावेत. जास्त कपडे घेतल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.
५) थंडीसाठी एक कमी वजनाचा पातळ पण उबदार स्वेटर, कानटोपी घ्यावी.
६) शक्यतो बुटांपेक्षा ऑल सिझन सँडल घ्यावी. पायातले मोजे, २/३ जोड घ्यावेत.
७) अंथरण्यासाठी एक संतरंजी, मॅट किंवा व्हाईट फोम. पांघरण्यासाठी एक शाल व पातळ पण ऊबदार कांबळ किंवा स्लिपींग बॅग सेट घ्यावा.
८) एक खणांचे छोटे ताट, ग्लास, चमचा बरोबर घ्यावा.
९) सुई दोरा, छोटी कात्री, नेलकटर, टुथपेस्ट, ब्रश, एक दोरी कपडे सुकविण्यासाठी, टॉर्च, पेपरसोप स्ट्रिप्स, एक प्लास्टिक गोणी फाडून घेतलेली बरोबर असू द्यावी.(वाटेत थकल्यावर सावलीत बसण्यासाठी) एक प्लास्टिक बॅग ओले कपडे ठेवण्यासाठी घ्यावी.
२०) एक वही व पेन (तुम्ही ज्या ज्या आश्रमात थांबता तिथला शिक्का मारण्यासाठी लागते), गरजे पुरतेच पैसे बरोबर असू द्यावे. त्यांचा संग्रह करुूनये.
२१) पूजेसाठी हळद कुंकवाच्या छोट्या डब्या, निरांजन किंवा पणती, तुपात भिजवलेल्या फुलवाती, मैयाचे पाणी घेतलेल्या पारदर्शक बाटलीसाठी एक वस्त्र, दंडारामसाठी कलावा, सुपारी, पूजा मांडण्यासाठी छोटे आसन, हवे असल्यास कापूर, (नसेल तरी चालतो), मैय्याची छोटीशा फोटो, मैय्याची आरती व अष्टकची झेरॉक्स (पाठ असेल तर उत्तम) सॅकचे वजन जास्तीत जास्त सात किलो पेक्षा जास्त नसावे.तर ही झाली आपली मैय्याच्या परिक्रमेची तयारी. पुढच्या भागात आपण पाहूया परिक्रमा कशी उचलावी.
नर्मदे हर... नर्मदे हर... नर्मदे हर भाग ६






