जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै
हे जग सुखी व्हावे व आपले हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे या संकल्पपूर्तीसाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. हे प्रयत्न म्हणजे जीवनविद्येच्या समाजोपयोगी राष्ट्रहीतप्रेरक तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार ! या ज्ञानाचा जितका अधिक प्रचार व प्रसार होईल, समाज तेवढा अधिक सुखी होईल व राष्ट्र प्रगतीपथावर जाईल. आज माणसाकडे इतके अज्ञान आहे की, माणूस हा एक अज्ञानी प्राणी आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. आज ही इतके अज्ञान आहे की सावकाराने कशावरही अंगठा घेतला तरी लोक देतात याचा परिणाम पिढ्यांपिढ्या त्या सावकाराच्या घरात गुलामगिरी करावी लागते. अशा अनिष्ट गोष्टी सतत घडत आहेत. याला प्रतिबंध म्हणून हे अज्ञान दूर व्हायला पाहिजे. जीवनविद्या हे अज्ञान दूर करण्याचाच प्रयत्न करते. अज्ञान कशाचे आहे, असे विचारलं तर मी उलट प्रश्न विचारेन, अज्ञान कशाचे नाही? लोकांकडे देवाबद्दल, धर्माबद्दल, संस्कृती, नियती, पाप पुण्य, सुख दुःख याबद्दल अज्ञानच आहे. अगदी जेवायचे कसे याबद्दलही लोकांमध्ये अज्ञान आहे. भोजन ही किती साधी गोष्ट आहे, पण आज नीट भोजन कसे करायचे हे किती लोकांना माहीत आहे? नामस्मरण नामस्मरण म्हणतात, पण नामस्मरण म्हणजे काय? स्मरण करायचे? नामाचे स्मरण करायचे की देवाचे स्मरण करायचे की इतर कोणाचे स्मरण करायचे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. शरीराबद्दल किती ज्ञान आहे? तिथेदेखील सखोल ज्ञान नाहीच, पण वरवरचे ही ज्ञान नाही. मनाबद्दल किती लोकांना ज्ञान आहे. मन आहे हे ही लोकांना ठाऊक नाही. सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, तुम्ही कुणालाही विचारा मन म्हणजे काय? तर ते त्यांना नीट सांगता येणार नाही. आपण मनाचा उल्लेख करतो, आज माझ्या मनात नाही, आज माझा मूड नाही, मी मनात आणेन तर तसे करेन, असा आपण आपल्या मनाचा उल्लेख करतो पण त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. प्राण किती महत्वाचा आहे, पण या प्राणाबद्दल काय माहित आहे. आपल्याला काहीही माहित नाही. लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विचार करीत असतात पण विचारांबद्दल किती लोकांना माहित आहे. चांगले विचार केले की चांगले होते व वाईट विचार केले की वाईट होते हे किती लोकांना ठाऊक आहे. म्हणजे अज्ञान किती आहे. अंधश्रद्धा येते कुठून? अज्ञानातून ! अविचार येतेय कुठून? अज्ञानातून. असमाधान येते कुठून? अज्ञानातून. असुया येते कुठून? अज्ञानातून. अहंकार येतो कुठून? अज्ञानातून. म्हणजे अज्ञानाच्या पोटी काय आहे, याची कल्पना केली तर या अज्ञानाच्या पोटात ब्रह्मांडे भरलेली आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडे या अज्ञानाच्या पोटात आहेत. म्हणून राष्ट्रप्रगतीसाठी, समाजहितासाठी, समाजातील सर्व घटकांचे भले होण्यासाठी हा अज्ञानाचा पडदा दूर होऊन, ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरायलाच हवा आणि यासाठीच जीवनविद्या मिशन कटिबद्ध व कार्यरत आहे.






