Thursday, December 11, 2025

मुख्यमंत्री सहायता निधीतून केवळ 75 हजार रुपये शेतकऱ्यांना दिल्याची माहिती चुकीची

मुख्यमंत्री सहायता निधीतून केवळ 75 हजार रुपये शेतकऱ्यांना दिल्याची माहिती चुकीची

मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टोक्ती; अंबादास दानवे यांना दिले उत्तर

नागपूर : "देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीत कोट्यवधी रुपये जमा होत असताना, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 75 हजार रुपयांची मदत दिली गेली", असा आरोप उबाठाचे माजी आमदार अंबादास दानवे यांनी गुरुवारी केला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले असून, ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अंबादास दानवेजी, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.”

मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत एकूण ६१ कोटी ५१ लाख ६९८ रुपये वितरित करण्यात आले आहेत. हा निधी दैनंदिन पातळीवर खर्च होत असल्याने रक्कम सातत्याने वाढत राहते. फक्त एका महिन्याची माहिती देऊन निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. शिवाय, शेतकऱ्यांना मदत केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच दिली जात नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्यांमार्फतही मोठ्या प्रमाणात मदत दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून १४ हजार कोटींहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, ही प्रक्रिया सुरूच आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले अंबादास दानवे?

दरम्यान, अंबादास दानवे यांनी आरोप केला की, “देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का?”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >