भारतीय भाषांसाठी नव्या तंत्रज्ञान युगाची सुरुवात
मुंबई : देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत आयआयटी बॉम्बेने स्वतःची पहिली एआय कंपनी "भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन"ची स्थापना केली आहे. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात नोंदणी झालेली ही कंपनी इंग्रजीवर आधारित परदेशी तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन भारतीय भाषांसाठी आणि भारतीय समाजाच्या गरजांसाठी तयार होणाऱ्या स्वदेशी एआय तंत्रज्ञानाचा पाया ठरणार आहे. ही कंपनी आयआयटी बॉम्बेची स्वतःची कंपनी आहे. या निर्णयाने आयआयटी बॉम्बे केवळ एक शिक्षण संस्था न राहता एआय-इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणारा महत्त्वाचा घटक म्हणून उदयाला येत आहे.
भारतजेनचा उद्देश म्हणजे किमान २२ भारतीय भाषांमध्ये काम करणारे मोठे भाषा-मॉडेल (एलएलएम) विकसित करणे हा आहे. मराठी, हिंदी, तमिळ, बंगाली, तेलुगू, पंजाबी, कन्नड, गुजराती यांसह सर्व प्रमुख भाषांचा या मॉडेलमध्ये समावेश आहे. पुढील टप्प्यात कोकणी, वारली, आदिवासी बोली आणि विदर्भातील बोलीभाषाही या एआयमध्ये जोडली जाणार आहे. हा एआय मजकूर, आवाज, दस्तऐवज आणि स्कॅन कागदपत्रंही समजून घेऊ शकेल.भारतीय भाषा वापरू देण्याचं स्वातंत्र्य देणारा प्रकल्प : आज जागतिक बाजारातील बहुतांश एआय इंग्रजीवर आधारित असल्यानं काही भारतीय नागरिकांना सेवा वापरण्यात अडचणी निर्माण व्हायच्या. भारतजेन त्या अडथळ्यावर मात करणार असून या प्रकल्पाचे चार प्रमुख उद्देश निश्चित करण्यात आले आहेत.
"भारतजेन जगातील सर्वात मोठ्या सरकारी मल्टीमॉडल एआय प्रकल्पांपैकी एक ठरत आहे.
प्रकल्पाचे चार मुख्य उद्देश :
- भारतासाठी स्वतंत्र, स्वदेशी एआय तयार करणे.
- मराठीसह सर्व भाषा डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणे.
- विद्यार्थ्यांसाठी आणि स्टार्टअप्ससाठी ओपन सोर्स एआय साधने उपलब्ध करणे.
- संशोधनासाठी मोठ्या प्रमाणातील भाषा-डेटा उभारणे.