नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक मान्यता मिळाली. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर नुकत्याच पार पडलेल्या युनेस्कोच्या आंतरशासकीय समितीच्या विसाव्या सत्रादरम्यान, दीपावलीचा मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधिक यादीत अधिकृतपणे समावेश करण्यात आला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल, वरिष्ठ अधिकारी, १९४ सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत या महत्त्वाच्या नोंदीचा स्वीकार करण्यात आला. दरम्यान, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने वर्ष २०२५-२६ साठी दीपावलीचे नामांकन केले होते. अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि संघर्षातून यशाकडे नेणारा हा सण आपल्या जीवनातील सकारात्मकतेचे प्रतीक आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी नमूद केले.
भारताचे १५ वारसे आधीच यादीत : युनेस्कोची ही यादी जगातील अशा सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्टींचा समावेश करते, ज्यांना स्पर्श करता येत नाही पण अनुभवता येते. याला अमूर्त जागतिक वारसा असेही म्हणतात. याचा उद्देश आहे की, हे सांस्कृतिक वारसे सुरक्षित राहावेत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचावेत.सध्या, भारताचे १५ वारसे आधीच इंटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज म्हणजेच अमूर्त जागतिक वारसाच्या यादीत स्थान मिळवून आहेत. यात दुर्गा पूजा, कुंभमेळा, वैदिक मंत्रोच्चार, रामलीला, छऊ नृत्य यांचाही समावेश आहे.






