आयसीयूसह सर्वसाधारण खाटांची जागा सुसज्ज
मुंबई : संसर्गजन्य रोगाच्या आजारांसाठी असलेल्या कस्तुरबा रुग्णालयातील भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेल्या कक्षाची आता सुधारणा करण्यात येणार आहे. आता कक्षातील आयसीयू आणि सर्वसाधारण कक्षाची सुधारणा करताना आवश्यक तो बदल करण्यात येणार आहे. ज्यामुळे भाजलेल्या रुग्णाला संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होईल तसेच बरा होण्याचे कालावधी कमी होणार आहे.
मुंबई महापालिकेचे कस्तुरबा रुग्णालय हे आशियातील सर्वात मोठे संसर्गजन्य रोग निवारक रुग्णालय आहे. मुंबईतील संसर्गजन्य आजाराच्या कस्तुरबा रुग्णालयाची स्थापना १८९२ करण्यात आली आहे. या रुग्णालयात २५ बेडचे बर्न्स केअर कक्ष आहे आणि २ शल्यक्रियागार कक्ष आहे. सन १९९१ पासून सुरु करण्यांत आले. या कक्षातील आयसीयू कक्षात पाच खाटा असून त्यात सामाईक सेवा देण्यात आली आहे. प्रत्येक खाटांदरम्यान पडदा लावण्यात आला आहे. त्यामुळे आता आयसीयूमधील प्रत्येक खाटांमध्ये पार्टीशन टाकले जाणार आहे. तर सर्वसाधारण कक्षामध्ये इतर सुविधाही वाढवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह ५.३३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भाजलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी असलेल्या कक्षाची सुधारणा करण्यात येणार असल्याने आता स्वच्छ आणि चांगले वातावरण निर्माण होईल. यामुळे जळीत रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी कमी होईल तसेच रुग्ण, कर्मचारी इत्यादींच्या हालचालीसाठी चांगली जागा आणि सुविधा उपलब्ध होईल.






