दोषमुक्तीबाबतचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला
मुंबई : एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करून भोसरीगांव ता. हवेली जि. पुणे येथील सर्वे क्र. ५२/२ए/२ अंतर्गत असलेल्या रु. ३३ कोटी मूल्याच्या जमिनीची खरेदी केवळ रु. ३.७५ कोटीमध्ये करून या भूखंडापोटी नुकसानभरपाई म्हणून एमआयडीसीकडून रु. ८० कोटी लाटण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी त्यांनी ५.५३ कोटी रुपयांची बेनामी फेरफार केल्याचे स्पष्ट झाले.
भोसरी भूखंड घोटाळ्यात खडसे यांनी दोषमुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात केलेला अर्ज फेटाळला असून या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचे मुबलक पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेले गुन्हे योग्य असून खडसे व कुटुंबीयांविरोधात दोषारोप निश्चित करण्यात यावेत असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.