डॉ. दीपक शिकारपूर (लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत)
आजच्या वेगवान जगात वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. कॅलेंडर हे वेळेचे नियोजन करण्याचे मुख्य साधन आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बिग डेटा ॲनॅलिसिस, रोबोटिक्स आदींमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा स्वयंभू बनत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वेगाने विकसित होत असल्याचा कॅलेंडर आणि वेळ व्यवस्थापनावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे आपल्या जीवनात मोठे बदल होत आहेत.
पूर्वी डिसेंबर महिना आला की डायऱ्या आणि कालदर्शिक (कॅलेंडर) आणणे अनिवार्य असायचे. घरोघरी स्वयंपाकघरात फ्रीजशेजारी भिंतीवर कॅलेंडर विराजमान होत असे. या कॅलेंडरवर अनेक सांसारिक गोष्टी लिहिल्या जात असत. साखर संपली, दूध, वाणसामान भरले, वाढदिवस, विवाहदिवस, दिलेले आहेर, प्रवास तारखा, उपास अशा अनेक गोष्टींची नोंद असे. नंतर त्यात पंचांगही आले. मुहूर्त, दिन विशेष अशा अनेक गोष्टी महिन्याच्या मागील पानावर वा उजवीकडील जागेत लिहिल्या जात असत. महत्त्वाचे सण कधी आहेत, गोरज मुहूर्त कुठले अशी इत्यंभूत माहिती कालदर्शिकेत असे. कॅलेंडर हे मराठी कुटुंबातील एक सदस्य असे. स्वयंपाकघरात त्याची हक्काची जागा असे. माझी आजी जुने कॅलेंडर न काढता त्यावरच नवीन वर्षाचे लावत असे. ‘असे का’ असे विचारताच ‘दूधवाले, कामाच्या बायांशी चर्चा (वाद) करताना मदत मिळते, कारण त्यावर खाडे, कमी जास्त अशा अनेक उपयुक्त गोष्टी लिहिलेल्या असत. अनेकदा मी आजीला रात्री कॅलेंडर्स वाचून कागदावर विशेष नोंदी लिहिताना पहिले. हे तू काय करते आहेस असे विचारता ‘तुला कळणार नाही’ असे उत्तर मिळायचे. आता गोष्टी वेगाने बदलत आहेत. या सर्व बाबी मोबाईल ॲपवर आहेत. मोबाईलचा आणखी एक फायदा म्हणजे तो सतत तुमच्याजवळ असतो. त्यामुळे तुम्हाला कुठेही माहिती मिळते. आजच्या वेगवान जगात वेळ व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. कॅलेंडर हे वेळेचे नियोजन करण्याचे मुख्य साधन आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बिग डेटा ॲनालिसिस, रोबोटिक्स या आणि यासारख्या घटकांमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आणि स्वयंभू बनत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वेगाने विकसित होत आहे आणि त्याचा कॅलेंडर आणि वेळ व्यवस्थापनावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे आपले दैनंदिन जीवन, काम आणि सामाजिक नियोजन करण्याच्या पद्धतीत मोठे बदल होत आहेत. त्यासाठी एआय टूल्स कॅलेंडर एआय, गुगल असिस्टंट, क्लॉकवाईज, शेड्युल एआय अशी अनेक लोकप्रिय कॅलेंडर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपले चॅटबॉट्सही मदत करतात. तुमच्या कॅलेंडरमध्ये अपॉइंटमेंट्स आणि मीटिंग्ज हाताने लिहायचे दिवस आता इतिहासजमा झाले. एआय-सक्षम वैयक्तिक सहाय्यक आता सूत्रे हाती घेत आहेत, तुमचे वेळापत्रक व्यवस्थापित करण्याचा ते एक संपूर्ण सखोल दूरगामी मार्ग देतात. नैसर्गिक भाषा प्रक्रिया क्षमतांनी सुसज्ज असलेले हे सहाय्यक वापरकर्त्यांना त्यांच्या कॅलेंडरशी संभाषणात्मक संवाद साधण्याची परवानगी देतात. तुमच्या व्हर्च्युअल सहाय्यकाला तुमच्या आगामी कार्यक्रमांबद्दल फक्त सांगा किंवा तुमच्या दिवसाचा सारांश विचारा आणि ते उर्वरित काम हाताळेल. या तंत्रज्ञानाचा वापर करणारे कॅलेंडर ॲप तुमच्या ऐतिहासिक वेळापत्रकांचे विश्लेषण करू शकतात, कमाल उत्पादकता तास ओळखू शकतात आणि बैठकीच्या सोयीस्कर वेळा सुचवू शकतात.
स्थान, उपस्थितांची उपलब्धता आणि निकड यांसारख्या घटकांचा विचार करून एआयचालित वेळापत्रक तुमचे कॅलेंडर तुमच्या अद्वितीय कार्यप्रवाहाशी सुसंगत असल्याचे सुनिश्चित करते. आयुष्य अप्रत्याशित असते आणि योजना अनेकदा बदलतात. कधी पाऊस पडतो, लोकांची विमाने चुकतात, काही वेळा लोक आजारी पडतात. अशा वेळी आपल्याला वेळापत्रक बदलावे लागते आणि त्यात अनेक घटक आणि व्यक्ती सहभागी असतात. एआय कालदर्शन ॲप्स गतिमान पुनर्नियोजन क्षमता सादर करत आहेत, ज्या अनपेक्षित परिस्थितीशी पटकन जुळवून घेऊ शकतात. शेवटच्या क्षणी बैठक रद्द करणे असो किंवा प्राधान्यक्रमांमध्ये अचानक बदल असो, तुमचे कॅलेंडर मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलितपणे समायोजित करू शकते आणि पर्यायी दिवस, स्थान व वेळ सुचवू शकते. हे तुमचे वेळापत्रक लवचिक आणि रिअल-टाइम बदलांना प्रतिसाद देणारे राहील, हे बघते. शेवटी अंतिम निर्णय तुमचा असतो. तुम्ही अनुमोदन दिले की पुढची कारवाई तत्काळ पार पडते. एआयमुळे कॅलेंडर केवळ साध्या नोंदी ठेवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते अधिक स्मार्ट आणि कार्यक्षम बनले आहे. एआय-आधारित कॅलेंडर आता उपलब्ध वेळेनुसार, प्राधान्यानुसार आणि इतर मीटिंगनुसार आपोआप भेटीगाठी (अपॉईंटमेंट्स) आणि कामे शेड्यूल करू शकतात. उदाहरणार्थ, कॅलेंडरमध्ये एकाच वेळी दोन मीटिंग येत असतील, तर एआय तुम्हाला सर्वोत्तम वेळ सुचवेल किंवा दोन्हीपैकी कोणती महत्त्वाची आहे हे ठरवून त्यानुसार नियोजन करेल.
एआय यंत्रणा वापरणाऱ्याच्या कामाचा पॅटर्न शिकते आणि त्यानुसार वेळेचे नियोजन करते. यामुळे कोणत्या कामासाठी किती वेळ लागतो, कोणता वेळ तुमच्यासाठी सर्वात उत्पादक आहे, हे समजायला मदत होते. यामुळे अनावश्यक वेळ वाया जाण्यापासून वाचतो आणि उत्पादकता वाढते. केवळ मीटिंगची वेळ लक्षात ठेवण्याऐवजी एआय मीटिंगच्या तयारीसाठी आवश्यक असलेली माहिती, उपस्थित राहणाऱ्या लोकांची माहिती आणि इतर संबंधित तपशील पाठवू शकते. उदाहरणार्थ, प्रवासाची आवश्यकता असेल तर ते वाहतुकीच्या स्थितीबद्दलही माहिती देईल. एका मीटिंगनंतर लगेच दुसरी मीटिंग वेगळ्या ठिकाणी असेल, तर एआय दोन्ही ठिकाणांमधील प्रवासासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्यास मदत करते; जेणेकरून तुम्ही वेळेवर पोहोचू शकता. गुगल असिस्टंट किंवा सिरी आता कॅलेंडरशी अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकतात. या माध्यमांना आवाजाद्वारे मीटिंग सेट करायला सांगता येते, एखाद्या इव्हेंटबद्दल विचारता येते किंवा दिवसाचे वेळापत्रक बदलण्यास सांगता येते. एआय कॅलेंडर म्हणजे फक्त वेळापत्रक आखणे नाही; तर आपण बैठका कशा प्रकारे आयोजित करतो याचे ऑप्टिमायझेशन करणेही आहे. कॅलेंडर ॲप्समध्ये बैठकीची उत्पादकता वाढवण्यासाठी एआय-संचलित अंतर्दृष्टी समाविष्ट केली जात आहे. या अंतर्दृष्टींमध्ये संबंधित कागदपत्रे, उपस्थितांशी मागील संवाद (मिनिट्स) आणि बैठकीदरम्यान रिअल-टाइम भावना विश्लेषणही समाविष्ट असू शकते. यामुळे अधिक अर्थपूर्ण आणि कार्यक्षम विचारविनिमय शक्य होतो. त्यामुळे पूर्णपणे सज्ज राहून कमी वेळेत जास्त साध्य करता येते.
निरोगी काम आणि जीवन संतुलन (वर्क लाईफ बॅलन्स) राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे संतुलन साधण्यास मदत करण्यात एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कॅलेंडर ॲप्स आता उच्च आणि निम्न क्रियाकलापांचे कालावधी ओळखण्यासाठी वेळापत्रकाचे विश्लेषण करू शकतात. या माहितीचा वापर करून, एआय लक्ष केंद्रित काम, वैयक्तिक क्रियाकलाप आणि विश्रांतीसाठी धोरणात्मक वेळ ब्लॉक सुचवू शकते. तुमचे कॅलेंडर कल्याणकारी उद्दिष्टांशी जुळते की नाही, अधिक संतुलित आणि परिपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देते की नाही, हे ते सुनिश्चित करते. एआय ॲप्स पाश्चिमात्य संस्कृतीचे पालन करत असल्याने शुभ-अशुभ, काळ-वेळ, मुहूर्त अशा बाबी नसतात. अनेकजण अमावस्येला महत्त्वाची कुठलीही गोष्ट करत नाहीत. त्यासाठी तुम्हाला पारंपरिक पंचांग पाहावे लागेल. पण आता चांगली बातमी म्हणजे ज्योतिषीही ऑनलाईन झाले आहेत. मराठी भाषेत उपलब्ध असलेल्या काही भारतीय पंचांग ॲप्समध्ये कालनिर्णय, मराठी कॅलेंडर - पंचांग, हिंदू कॅलेंडर- द्रिक पंचांग आणि सनातन पंचांग यांचा समावेश आहे. या ॲप्समध्ये तुम्हाला दैनिक पंचांग, तिथी, नक्षत्र, शुभ-अशुभ वेळ तसेच मराठी सणांची माहिती मिळेल. एखाद्या भारतीय उद्योगाने एआय कॅलेंडर पंचांगासकट विकसित केले तर त्यालाही भारतात चांगली संधी आहे. जे काम पूर्वी खासगी सचिव करत असत, ते आता एआय कॅलेंडर टूल्स प्रभावीपणे करतात. काळानुसार बदल घडले, माणसे बदलली, विचार बदलले. आता अनेक घरांमध्ये कालदर्शिका नसते (कारण गरज संपली), काही घरांमध्ये उपचार म्हणून कॅलेंडर असते पण त्यावर पूर्वीसारखे लिखाण नसते. कालाय तस्मै नमः