वंचितांचा आवाज निमाला!

डॉ. बाबा आढाव केवळ व्यक्ती नव्हती. गेली सात दशकं महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यांत, जिथे अन्याय होईल तिथे धावून जाणारा, समता आणि न्यायासाठी झगडणारा, आपल्या असेल त्या सामर्थ्यानिशी (वयाच्या कोणत्याही टप्प्यावर) प्रस्थापित व्यवस्थेशी दोन हात करायला तयार असणारा, विद्वानांबरोबर विचारसरणीचे वाद घालता घालता सहजपणे कष्टकऱ्यांबरोबर त्यांच्याच भाषेत संवाद साधणारा, सनदशीर मार्गावर गाढ निष्ठा असणारा, सत्ताधारी कोणीही असोत; त्यांच्यावर नैतिक धाक असलेला आवाज होता. हा आवाज परवा रात्री, वयाच्या ९४ व्या वर्षी पुण्यात निमाला. अस्पृश्यतेविरोधात महाराष्ट्रात गेली दीड-दोनशे वर्षे लढा सुरू आहे. पण, अस्पृश्यतेच्या शेवटच्या अवशेषावर शेवटचा घाव घालणारा अस्पृश्योद्धारक म्हणून इतिहासाला डॉ. बाबा आढाव यांचीच नोंद ठेवावी लागेल. आजोळच्या सत्यशोधक आणि घरातल्या वारकरी संस्कारांतून बाबांनी वयाच्या २३ व्या वर्षी सार्वजनिक जीवनाकडे आपली पावलं वळवली. मिश्र वैद्यकीचं शिक्षण घेतल्यानंतर १९५३ मध्ये पुण्यात हडपसरला स्वतःचा दवाखाना सुरू केला. पण, येणाऱ्या रुग्णांच्या आजारांचं निदान करताना रुग्णांचे आजार केवळ शारीरिक नाहीत, त्यांच्या शारीरिक व्याधींनाही कारणीभूत इथल्या वेगवेगळ्या शोषण व्यवस्था आहेत, हे लक्षात आल्यानंतर केवळ वैद्यकीत त्यांचं मन रमेना. १९६० मध्ये दादा गुजर आणि अन्य काही सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी 'महाराष्ट्र आरोग्य मंडळा'ची स्थापना केली. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ या तीनही जनआंदोलनांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. 'स्वातंत्र्य चळवळीतील मूल्यविचारांनी राष्ट्र निर्मितीसाठी तळागाळात काम करणारा कार्यकर्ता' ही ओळख त्यांनी किमान सात दशकं अभिन्न राखली. कुठलीही वैचारिक तडजोड न करता, एका पैशाच्या गैरव्यवहाराचा संशयही कोणाला घेता येणार नाही, इतक्या स्वच्छ, निष्कलंक सार्वजनिक आयुष्याचा आदर्श बाबांनी वर्तमान काळात समाजासमोर ठेवला!


बाबा आढाव यांनी राजकारणाची वाट धरलीच नाही, असं नाही. पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडूनही गेले होते. पण, पुणे महापालिकेचे तेव्हाचे कारभारी झोपडपट्ट्यांच्या सुधारणांसाठी संवेदनशील नाहीत, हे पाहून त्या भ्रमनिरासातून त्यांनी पालिकेच्या राजकारणाकडे पाठ फिरवली. त्यानंतर लोकाग्रहास्तव दोनदा लोकसभेची निवडणूकही लढवली. पण, निवडणुकीच्या बेरीज-वजाबाकीत, सत्तेच्या गणितात सामान्यांचे प्रश्न प्रामाणिक प्राधान्याचे नसतात; अशा राजकारणासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात, त्यातून सामाजिक आग्रहही काही प्रमाणात सौम्य करावे लागतात हे पाहिल्यानंतर त्यांनी त्या राजकारणाकडेच कायमची पाठ फिरवली आणि आयुष्यभर 'संसदबाह्य राजकारणा'चा आग्रह धरला. 'संसदीय की संसदबाह्य राजकारण?' हा त्याकाळी समाजवाद्यांमध्ये मोठा वादाचा विषय होता. युवक क्रांती दलासह त्या काळात सर्वोच्च शिखरावर असलेल्या सर्व डाव्या संघटनांत हा वाद टोकाला गेला. त्यातून चळवळीची शक्ती विभागली. 'संसदबाह्य राजकारणा'चा अतिरेकी आग्रह धरल्याचा आरोप बाबांवर झाला. त्यातून ते समाजवादी वर्तुळातही बाजूला पडले! पण, प्रामाणिक भूमिका आणि प्रभावी, तर्कशुद्ध मांडणीमुळे त्या काळच्या डाव्या चळवळीतील युवकांवर बाबांच्याच विचारांचा प्रभाव राहिला. समाजवादी आणि कम्युनिस्ट या दोन्ही पक्षांची त्यांच्याच विचारांच्या जनसंघटनांशी नाळ तुटली आणि त्यामुळे या दोन्ही विचारांच्या पक्षांचा कालांतराने ऱ्हास झाला, असं मानणारा मोठा गट आजही आहे. त्यात तथ्यही आहे. पण, बाबांपुरतं बोलायचं, तर त्यांनी आपल्या आयुष्यात ही सीमारेषा कसोशीने पाळली. जनसमूहाचा व्यापक पाठिंबा मिळाल्यानंतर, असंघटित क्षेत्रातील निर्णायक ताकद हाती आल्यानंतरही आपल्या भूमिकेत बदल करण्याचं त्यांच्या मनातही आलं नाही. उपेक्षित-वंचितांच्या जनचळवळींना त्यांनी स्वतःला बांधून घेतलं. अनेक चळवळींना जन्म दिला.
वंचित-शोषितांच्या अनेक चळवळींचे, त्यांच्या संघटित ताकदीचे आणि त्यांच्याच आग्रहातून आलेल्या अनेक कायद्यांचे बाबा जन्मदाते आहेत. महात्मा जोतिबा-सावित्रीमाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची परंपरा डॉ. बाबा आढाव या नांवापाशी येऊन संपते. अस्पृश्यतेची महाराष्ट्रातली शेवटची खूण संपवण्यासाठी बाबांनीच १९७२ मध्ये 'एक गाव-एक पाणवठा' चळवळ उभारली. त्याआधी १९६१ मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची देशातली पहिली 'महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद' स्थापना केली. प्रकल्पग्रस्तांसाठी देशातला पहिला पुनर्वसन कायदा १९७६ साली इथेच करवून घेतला. पाठीवर साऱ्या जगाचं ओझं घेणाऱ्या हमालांचं पहिलं संघटन 'हमाल पंचायत' या नांवाने बाबांनीच बांधलं. या क्रांतिकारी संघटनेच्या बळावर आधी' हमाल-मापाडी' आणि नंतर माथाडी बोर्डची स्थापना झाली; असंघटितांचे प्रश्न ऐरणीवर आले. त्यांच्यासाठी अनेक कायदे झाले. 'हमाल पंचायती'ने जबाबदार, सामाजिक भान असलेल्या कामगार चळवळीचा आदर्श घालून दिला. कागद-काच-पत्रा-कचरा वेचक महिला, मोलकरणींना संघटित होण्याचा मार्ग याच संघटनेने दाखवला. देवदासी प्रथा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, विषमता निर्मूलन अशा अनेक समाजसुधारक चळवळींना बाबांनी बळ दिलं. १९५६ पासूनच्या सुमारे ७० वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी तब्बल ५० वेळा तुरुंगवास भोगला. त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल योग्य कृतज्ञता व्यक्त करायचं त्यांच्या हयातीत राहून गेलं, एवढी खंत जरी सांप्रत समाजाला वाटली, तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!

Comments
Add Comment

नाईट ऑफ फायर डे ऑफ शेम!

एरवी गोवा हे तसे शांत राज्य. तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. अर्थात अगदी उत्तर प्रदेश किवा बिहारसारखी

पुतीन यांच्या भेटीचा मथितार्थ

आंतरराष्ट्रीय राजकारणात ऑप्टिक्सला प्रचंड महत्त्व असते. भारत आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या भारत

महामानवाला वंदन

जय भीम' अशी कोणी साद घातली, तर तो 'आंबेडकरवादी' असा पूर्वी समाजाचा दृष्टिकोन होता. दलित, वंचिताच्या हक्कांसाठी

पुतिन भेटीतील ‘अर्थ’

तिन यांच्या भारत भेटीची आज जागतिक पातळीवर चर्चा होत असली तरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पंतप्रधान

धुरळा कशासाठी ?

भारतात लोकशाही केवळ निवडणुकांमधेच शिल्लक असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध लोकशाहीवादी संघटना

मानवतावादाचा मुखवटा

कोणताही संघर्ष आतापर्यंत युद्धाने संपलेला नाही आणि कोणताही पेच युद्धाने सुटलेला नाही. तरीही युद्धे सातत्याने