नागपूर : महाराष्ट्रात भाषेच्या आधारावर वाढत्या हिंसाचारावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी टीका केली आहे. नागपूर येथील विधीमंडळ परिसरात अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ अबू आझमी आणि रईस शेख यांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.
‘मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशभरातून लोक येथे रोजगारासाठी येतात. जे येथे जन्मलेले नाहीत किंवा ज्यांचे शिक्षण येथे झाले नाही, त्यांना मराठी शिकवायची असेल तर ती प्रेमाने शिकवा. पण भाषेच्या नावावर मारहाण करणे आणि दुकान तोडणे हे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असे अबू आझमी म्हणाले. त्यांनी नाव न घेता मराठीवरुन राजकारण ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. मराठी भाषा अनिवार्य करायची असेल तर ती शाळांमध्ये सक्तीची करावी, पाठ्यपुस्तके वाटावीत. पण भाषेच्या नावावर व्यक्तिगत हल्ले आणि अपमान होत असेल तर त्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
‘देशभरात व्यवसाय असलेल्या अनेक कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत. तिथल्या कर्मचाऱ्यांना मराठी बोलायला कोणी सांगत नाही. पण रिक्षाचालक, भाजीविक्रेते किंवा रस्त्यावर कष्ट करणाऱ्या गरीब मजुरांनाच लक्ष्य केले जाते. त्यांच्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल केले जातात.' या प्रकरणात कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अबू आझमींनी केली.






