Wednesday, December 10, 2025

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) ॲपद्वारे तिकिट बुकिंग वाढले असले, तरी त्याचबरोबर बनावट तिकिटांचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात समोर येत असल्याने रेल्वेने आता नियम कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक प्रवासी बनावट तिकिटांचा वापर करत असल्याचे उघड झाल्यानंतर टीसींची तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्याचबरोबर मासिक पास धारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता पास काढताना ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असेल. ऑनलाइन सीझन तिकीट बुक करतानाही प्रवाशांना वैध ओळखपत्राची माहिती सादर करावी लागेल. ओळखपत्रावरील तपशील आणि सीझन तिकिटावरील माहिती एकसारखी असणे बंधनकारक असेल. ओळखपत्र नसल्यास मासिक पास जारी केला जाणार नाही.

एसी लोकलमध्येही आता कडक तपासणी होणार असून टीसी प्रत्येक डब्यात जाऊन तिकिटे तपासतील. त्यामुळे विनातिकिट आणि बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने जीआरपीला बनावट तिकिट तयार करणाऱ्या आरोपींविरोधात जलदगतीने गुन्हे दाखल करण्याची विनंती केली आहे.

या गुन्ह्यांसाठी भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यातील कलम ३१८(२), ३३६(३), ३३६(४), ३४०(१), ३४०(२) आणि ३/५ अंतर्गत कारवाई केली जाईल. यामध्ये फसवणूक, बनावटगिरी आणि संबंधित अपराधांचा समावेश असून दोषी ठरल्यास दंडासह सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >