Wednesday, December 10, 2025

सामाजिक भान जपणारी डेंटिस्ट

सामाजिक भान जपणारी डेंटिस्ट

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे

महिलांनी किती प्रगती साधली आहे, यावरून मी समाजाची प्रगती मोजतो.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या उक्तीवरून कोणत्याही प्रगतिशील समाजाचे मूल्यांकन करणे सोपे झाले आहे. ६ डिसेंबर रोजी तिच्या मोफत दंत तपासणी शिबिराच्या दालनास भेट दिली तेव्हा बाबासाहेबांच्या त्या उक्तीची प्रकर्षाने आठवण झाली. आपण शिकलो, स्थिरस्थावर झालो, आता समाजाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे हे तिच्या कृतीतून जाणवत होते. दंतचिकित्सा ही महागडी उपचारपद्धती समजली जाते. मात्र ही उपचारपद्धत वंचितांना मिळावी यासाठी तिची धडपड सुरू आहे. वंचितांसाठी धडपणारी ही दंतवैद्य आहे जिजाऊ डेंटल क्लिनिकची डॉ. प्रज्ञा सावंत.

इंग्रजांनी भारतात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आणि त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग त्यांनी भारतीयच निवडला. अशाच पायाभूत सुविधेतील एक होती रेल्वे. या रेल्वे मध्ये काम करण्यासाठी इंग्रजांनी अनेकांना निवडले. न्हावळीच्या केशवची सुद्धा निवड झाली. त्याला रेल्वे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. केशवने भुसावळ मध्ये आपले बिऱ्हाड थाटले. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र केशवरावांनी जपला. आपली ५ मुले आणि ४ मुलींना शिकवले. त्यापैकी गोविंद, वसंत आणि किशोर रेल्वेमध्ये रुजू झाले, तर दिलीप आणि अशोक बँकेत अधिकारी झाले. अशोकचा विवाह विद्यासोबत झाला. या दाम्पत्याची तीन अपत्ये प्रज्ञा, कल्पेश आणि हितेश.

प्रज्ञाचं शालेय शिक्षण भुसावळच्या सेंट एलॉयशियस कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये झाले. वाशीच्या एमजे महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यावर प्रज्ञाने दंतवैद्यक क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. संगमनेरच्या एसएमबीटी दंतमहाविद्यालयातून तिने बीडीएसची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रज्ञाने प्रभादेवीच्या एका दाताच्या दवाखान्यात पहिली नोकरी केली. त्यानंतर विविध ठिकाणी नामांकित दंत वैद्यांकडे तिने दंतवैद्य म्हणून नोकरी करत अनुभव मिळवला. तब्बल नऊ वर्षे नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर प्रज्ञाने स्वतःचा दातांचा दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. २०१८ मध्ये कामोठे येथे ‘पिंक स्माइल डेंटल क्लिनिक’ सुरू झाले.

दवाखान्यास उत्तम प्रतिसाद मिळत होता. दवाखाना आता स्थिरस्थावर झाला आहे असे वाटत असतानाच कोरोनाची अवघ्या जगात साथ पसरली. वेगाने पसरणाऱ्या या आजारास आळा घालण्यासाठी सरकारने जी पावले उचलली त्याची पहिली कुऱ्हाड दंतवैद्य क्षेत्रावर पडली. दातांचे दवाखाने बंद करण्याचे सरकारने निर्देश दिले. हळूहळू हे निर्देश सर्वच उद्योग-व्यवसायांना लागू झाले. वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून काम ही संकल्पना दृढ झाली. याच दरम्यान प्रज्ञाला एका कॉर्पोरेट कंपनीमधून वर्क फ्रॉम होम नोकरीची संधी आली. घरात बसून राहण्यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील माहिती अद्ययावत होईल या अपेक्षेने प्रज्ञाने ती नोकरी स्वीकारली. दरम्यान प्रज्ञाचा जनसंपर्क क्षेत्रातील प्रमोद सावंत या तरुणासोबत विवाह झाला.

क्लिनिकल डॉक्युमेंटेशन स्पेशालिस्ट ते टीम मॅनेजर असा नोकरीचा पाच वर्षांचा अनुभव घेतल्यावर प्रज्ञाने पुन्हा आपल्या दाताच्या दवाखान्याकडे मोर्चा वळवला. अंधेरीमध्ये दाताचा दवाखाना सुरू केला. काही महिन्यानंतर दुसऱ्या मुलाच्या प्रसुतीसाठी प्रज्ञाने वैद्यकीय सेवेतून विश्रांती घेतली. अश्वथ आणि इवान अशी दोन मुले प्रज्ञा-प्रमोदचा संसार फुलवत आहेत. कामोठे येथे स्थिरावल्यावर प्रज्ञाने नव्या स्वरूपात दातांचा दवाखाना सुरू केला. स्वराज्यजननी जिजाऊच्या नावे ‘जिजाऊ डेंटल क्लिनिक’ असे नामकरण केले.

दंतोपचार हे खर्चिक असतात. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसतात. मात्र दात हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. जर मौखिक निगा राखली नाही तर हृदयरोग, तोंडाचा कर्करोग, मेंदूचा झटका, मधुमेह, फुप्फुसाचे आजार, हिरड्यांचे विकार, दातकिडी, तोंडाची दुर्गंधी असे नानाविध आजार होऊ शकतात. सामान्य माणूस परवडत नाही म्हणून दंतोपचारापासून दूर राहू नये यासाठी डॉ. प्रज्ञा गरजू रुग्णांवर माफक दरांत उपचार करतात. यासाठी त्यांनी एका नामांकित वित्तीय संस्थेची ईएमआय सुविधा देखील कार्यान्वित केली आहे. माफक दरांत उपचार करत असताना त्यांनी उपचाराच्या दर्जा सोबत कधीही तडजोड केली नाही. उपचारासाठी जी काही सामग्री लागते, उपकरणे लागतात ती सगळी मान्यताप्राप्त आणि उच्च दर्जाची असतात. रुग्णांना त्यांच्या दातांचा एक्सरे त्यांच्या मोबाइलवर त्वरित मिळावा यासाठी आधुनिक क्ष-किरण यंत्रणा बसवली आहे. डॉ. प्रज्ञा सावंत यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा यासाठी ‘बोटाची शाई दाखवा, मोफत दंत तपासणी करा’ अशी आगळी वेगळी मोहीम राबवली होती. ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. प्रज्ञा यांनी शिवाजी पार्क येथे मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शेकडो भीम अनुयायांनी या शिबिराचा लाभ घेतला. निवृत्त सैनिक, पोलीस, विशेष बालक यांची निःशुल्क तपासणी केली जाते. तसेच क्ष-किरण सेवा देखील मोफत दिली जाते. दर्जेदार सुविधा, आस्थेवाईक सेवा या गुणांमुळे अल्पावधीत डॉ. प्रज्ञा सावंत यांच्या ‘जिजाऊ डेंटल क्लिनिक’ने नागरिकांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रज्ञा सावंत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यांना सन्मानित केले होते.

वंचित, गरजू विशेषतः आदिवासी पाड्यातील दंतरोगाने पिडीत रुग्णांवर दंतोपचार करण्यासाठी ‘डेंटिस्ट ऑन व्हील’ ही संकल्पना राबविण्याचे डॉ. प्रज्ञा यांचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमासाठी मदत करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, संस्था वा सीएसआर उपक्रम राबवू पाहणाऱ्या कंपनीचा शोध त्या घेत आहेत. व्यवसायाला जर सामाजिक जाणिवेची जोड मिळाली तर तो व्यवसाय उदात्त ठरतो. जिजाऊ डेंटल क्लिनिकच्या डॉ. प्रज्ञा सावंत यांचा व्यवसाय सर्वार्थाने उदात्त आहे.

Comments
Add Comment