नागपूर : "छोटी राज्ये ही अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्यामुळे याबाबत भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात असून सर्व क्षेत्रात विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत", अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर दिली.
विधानभवन परिसरात बुधवारी माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “भाजपचा जाहीरनामा हा छोट्या राज्याचाच आहे. विदर्भाला खऱ्या अर्थाने विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०१४ नंतर विदर्भाच्या संपुर्ण विकासाची योजना तयार झाली. आम्ही विकसित विदर्भाच्या बाजूने काम करतो आहोत. सुरुवातीपासूनच छोटे राज्य हे विकसित राज्य होऊ शकतो यासाठी भाजपचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संपूर्ण विदर्भाचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात असून सर्व क्षेत्रात विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”
काँग्रेसने विदर्भाचा विकास केला नाही
“काँग्रेसने कधीही विदर्भाचा विकास केला नाही. त्यामुळे त्यांचे विदर्भात पतन झाले. विदर्भात काँग्रेसला कुठल्याही मुद्यावर लोक मत देत नसल्याने भावनिक मुद्दा घेऊन काँग्रेस राजकरण करत आहे. पण त्यांना याचा फायदा होणार नाही,” असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका महायुतीतच
“परवा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मी आमच्यात चर्चा झाली. या चर्चेत महाराष्ट्रात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकांमध्ये आम्ही महायुतीमध्ये एकत्रित निवडणूका लढवणार आहोत. तसेच निवडणूकीची रचना कशी असेल, याबाबत आम्ही महापालिका आणि जिल्हास्तरावर अधिकार दिले आहेत,” असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.






