इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या स्वातंत्र्य मोर्चा हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात 'पाकिस्तान मुर्दाबाद' आणि 'सिंधुदेश आझादी'च्या घोषणा देण्यात आल्या. जिये सिंध मुत्तहिदा महाजच्या (JSMM) नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा सुरू असताना पोलिसांनी आयत्यावेळी मार्ग बदलण्याचे निर्देश दिले. यामुळे मोर्चात सहभागी झालेले नागरिक संतापले. संतप्त जमावाने दगडफेक आणि तोडफोड सुरू केली. पोलिसांनी जमावावर अश्रुधुराच्या मारा केला. या धुमश्चक्रीत निवडक नागरिक आणि काही पोलीस जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली.
भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे 'एक दिवस सिंध पुन्हा भारतात परत येईल' हे वक्तव्य मागील कही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या वक्तव्यानंतर पाकिस्तानमधील आंदोलनाला बळ मिळाल्याची चर्चा आहे. या आंदोलनाला अधिक बळ मिळाल्यास पाकिस्तानसाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार जिये सिंध मुत्तहिदा महाजच्या रविवारच्या मोर्चाचा मार्ग आयत्यावेळी बदलण्यात आला. यामुळे झालेल्या हिंसाचार प्रकरणी ४५ जणांना अटक झाली आहे. आणखी काही जणाना अटक होण्याची शक्यता आहे. या हिंसाचारात पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आणि पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे निर्देश सरकारने पोलिसांना दिले आहेत.