नागपूर : महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य करीत, सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, "महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत. शक्यतो सगळीकडे एकत्र लढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. एकनाथ शिंदे नेहमीच माझे कौतुक करतात, मी त्यांचे कौतुक करतो. आम्ही दिलखुलास मित्र आहोत. त्यामुळे मनात काही न ठेवता आम्ही कौतुक करतो. आमच्यात काही राडा नाही, काही रोडा नाही", असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, “राहुल गांधी संसदेच्या अधिवेशनात असो किंवा नसो त्याने काहीही फरक पडत नाही. कारण त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. रोज संविधानाचा अपमान करणे, संविधानाने तयार केलेल्या संस्थांचा अपमान करणे हा त्यांचा अजेंडा आहे. ते देशात राहून देशातील संविधानिक संस्थांचा अपमान करतात आणि परदेशात जाऊन देशाचा अपमान करतात. आता जर्मनीमध्येही ते पुन्हा आपल्या देशाचा आणि आपल्या लोकशाहीचा अपमान करतील. त्यामुळे त्यांच्याकडून जास्त काही अपेक्षा नाहीत.”
अभिमन्यू पवार यांच्याबद्दल गैरसमज
“अभिमन्यू पवार यांना झापले म्हणणे चुकीचे ठरेल. कालच्या प्रकरणात एकप्रकारे त्यांच्यावर अन्यायच झाला. कारण ते बोलले वेगळे आणि मी वेगळे ऐकले. त्याच्यापूर्वी एका प्रकरणात कुणीतरी लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मी त्यावर बोललो होतो. अभिमन्यू पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींची मुले अवैध दारूकडे जात आहेत. माझ्या ऐकण्यात काहीतरी वेगळे आले आणि मी त्यांना लाडक्या बहिणींवर आक्षेप घेऊ नका असे म्हटले. त्यानंतर सगळ्या चॅनेलने मी त्यांना झापले असे छापले. पण माझा गैरसमज झाला असून त्यांनी योग्य प्रश्न मांडला होता,” असेही त्यांनी स्पष्ट केले. रेस्क्यु सेंटर तयार झाल्यावर बिबट्यांना पकडण्याचा वेग वाढेल
“राज्याच्या विविध भागात बिबट्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळत असून त्यासंदर्भात वनविभागाने काम सुरु केले आहे. आतापर्यंत जवळपास २२ बिबट्या पकडले आहेत. रेस्क्यु सेंटरचे काम हाती घेतले असून ते तयार झाल्यावर बिबट्यांना पकडण्याचा वेग वाढवता येईल. जंगलातील बिबट्यापेक्षा शेतात किंवा ऊसात जन्माला आलेला बिबट जास्त शहराकडे येतो. त्यामुळे त्यांना पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु आहे,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करणे अतिशयोक्ती
“निवडणूक आयोगाचे काही निर्णय आम्हालाही मान्य नाही. मीसुद्धा त्यावर टीका केली आहे. निवडणूका पुढे नेणे अयोग्य होते, असे मलाही वाटते. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यावर स्पष्टपणे टीका केली आहे. पण त्यांनी तो निर्णय घेतला. परंतू, तेवढ्या निर्णयांकरिता त्यांना पदावरून हटवण्याची मागणी करणे ही अतिशयोक्ती आहे. त्यामुळे आमची तरी अशी कुठलीही मागणी नाही,” असेही ते म्हणाले. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात दोषींवर कारवाई होणार
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर एफआयआर का दाखल केला नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटले ते मी ऐकले नाही. पण कोर्टाने जे काही विचारले त्यासंदर्भात योग्य उत्तर सादर केले जाईल. कुणालाही वाचवायचे नाही, ही सरकारची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे यासंदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे, याची सगळी माहिती आम्ही उच्च न्यायालयाला देऊ.”






