Wednesday, December 10, 2025

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

मुंबई मेट्रो वनचे तिकीट  उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी

मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक सुखकर होणार आहे. मुंबई मेट्रो वनने प्रवाशांना अधिक स्मार्ट, वेगवान आणि अखंडित प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण डिजिटल पाऊल उचलले आहे. मुंबई मेट्रो वनची तिकिटे थेट उबर ॲपवरून खरेदी करता येणार आहेत. या नवीन सुविधेमुळे दररोजच्या लाखो प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुकर, सुलभ आणि डिजिटलदृष्ट्या प्रगत होणार आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो १ प्रशासनाने दिली आहे.

या सहकार्यामुळे प्रवासी त्यांचे मेट्रो प्रवासाचे नियोजन, बुकिंग आणि पेमेंट हे सर्व एकाच ॲपमधून करू शकतील. यासुविधेमुळे ॲप बदलण्याची गरज उरत नाही आणि तिकिट खरेदी प्रक्रियेत लागणारा वेळ व कटकट मोठ्या प्रमाणात कमी होते. उबर ही देशातील सर्वाधिक वापरली जाणारी शहरी गतिशीलता प्लॅटफॉर्म असून मोठ्या आणि सक्रिय युजरबेसमुळे, मेट्रो तिकिटे खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी, गतिमान आणि सर्वांना उपलब्ध होणार आहे. या एकत्रीकरणाबद्दल बोलताना मुंबई मेट्रो वनचे सीईओ श्यामन्तक चौधरी म्हणाले," प्रवाशांसाठी मेट्रो प्रवास अधिक सोपा आणि सहजसुलभ बनवणे हे आमचे सातत्यपूर्ण ध्येय आहे. मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवर उपलब्ध करून देणे हे अधिक स्मार्ट आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम प्रवासाकडे जाणारे आणखी एक पुढचे पाऊल आहे. आम्ही प्रवाशांना जिथे आहेत तिथेच सेवा देण्यास कटिबद्ध आहोत, आणि सार्वजनिक वाहतुकीला अधिक एकत्रित, सोयीस्कर आणि भविष्यसिद्ध बनवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.'

सुविधेचे फायदे
  • मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वीकार
  • लाखो प्रवासी वापरत असलेल्या ॲपमधून तिकिट खरेदी
  • मल्टीमोडल प्रवासाचा अखंड अनुभव
  • ऑटो, कॅब आणि मेट्रोचे एकत्रित नियोजन
  • फास्ट, फ्रिक्शनलेस तिकीटिंग ॲप बदलण्याची गरज नाही
  • जागतिक दर्जाच्या डिजिटल मोबिलिटी सुसंगत सेवा
Comments
Add Comment