मोहित सोमण: मिशोचे (Meesho Limited IPO) आज शेअर बाजारात दमदार पदार्पण झाले आहे. मिशोचा शेअर बाजारात ४६.४% प्रति शेअर प्रिमियमसह पदार्पण झाल्याने या आयपीओचे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. माहितीनुसार सकाळच्या सत्रात शेअर बाजारात पदार्पण केल्या केल्याच कंपनीचा शेअर मूळ प्राईज बँड १०५ ते १११ रूपयांच्या तुलनेत १६२.५० रूपये प्रति शेअरसह बाजारात सूचीबद्ध (Listed) झाला आहे. त्यामुळे ५४२१ कोटी मूल्यांकनांच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. विशेषतः आयपीओला एकूणच ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत ७९ पटीने सबस्क्रिप्शन मिळाल्यानंतर तज्ञांच्या मते ३२ ते ४०% प्रिमियमसह शेअर बाजारात सूचीबद्ध होईल याची शक्यता निर्माण झाली होती. त्या अपेक्षेलाही मागे सारत शेअर ४६% प्रिमियमसह बाजारात सूचीबद्ध झाला आहे. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ७२७५१.६७ कोटीवर पोहोचले आहे.
एकूणच कंपनीच्या आयपीओला २.३५ पटीने सबस्क्रिप्शन पहिल्याच दिवशी मिळाले होते. आयपीओपूर्वी कंपनीने २४३९ कोटीचा निधी अँकर गुंतवणूकदारांकडून प्राप्त केला होता. या इ कॉमर्स कंपनी मिशोने आयपीओसाठी ७५% वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १५% वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १०% वाटा राखीव ठेवला होता. संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीच्या महसूलात सप्टेंबरपर्यंत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २६% वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ११०३% घसरण झाली आहे.