नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. राकेश किशोर नावाच्या वकिलाने ऑक्टोबर महिन्यात हे दृष्कृत्य केले होते. या घटनेचा देशभरातली सामाजिक कार्यकर्ते, विद्वान, बुद्धीजीवींनी निषेध केला होता. या घटनेच्या निषेधार्थ राकेश किशोर यांना न्यायालयाच्या परिसरातच काही वकिलांनी इंगा दाखवला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून समजते की, राकेश किशोर यांना थेट चप्पलने मारहाण करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिल्लीतील करकडडूमा न्यायलयाच्या परिसरात ही घटना घडली आहे. राकेश किशोर या वकिलाला काही वकिलांनी थेट चप्पलने मारहाण केली आहे. राकेश किशोर करकडडूमा न्यायालय परिसरात आला होता. यावेळी त्याला काही वकिलांनी घेरून मारहाण केली. त्यानंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून राकेश किशोर याला बाहेर काढले.
View this post on Instagram
दरम्यान, आता राकेश किशोर याला मारहाण झाल्यानंतर समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. हिंसेला हिंसेनेच प्रत्युत्तर देऊ नये, असे मत काही लोकांनी व्यक्त केले आहे. तर राकेश किशोर याला चपलेने मारले ते योग्यच केले असेही काही लोक म्हणत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






