मुंबई: इंडिगो एअरलाईन्स (Interglobe Aviation Limited) कंपनीचे सीईओ पीटर इलिबर्स यांना सरकारने चौकशीसाठी तत्काळ समन्स बजावले आहे. डीजीसीए (Directorate General of Civil Aviation DGCA) विभागाने ११ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाईन्सने एक दिवसाची मुदतवाढ मागितली होती मात्र सरकारने ती नाकारत चौकशीचे आदेश देतानाही संपूर्ण माहिती अहवालासह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणात विमान प्रवाशांचे हाल झाल्यानंतर सरकार अँक्शन मोडवर आले आहे. २००० पेक्षाही अधिक विमाने रद्द झाल्यावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली. घटलेल्या विमानांमुळे कंपनीने ३००० ते ६० ते ८० हजार रूपयांपर्यंत तिकिटाचे दर सरकारने ताकीद देऊनसुद्धा वाढवले होते या प्रकरणीही कंपनीची कसून चौकशी केली जाऊ शकते. डीजीसीएच्या सूत्रांचे म्हणणे आहे की एअरलाइनने प्रवाशांना पाठवल्या जाणाऱ्या रिअल-टाइम अपडेट्सचे पुरावे दाखवावेत अशी विचारणा केली आहे.
काल सीईओ पीटर इलिबर्स यांच्याकडून विमान सेवा पूर्ववत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी डीजीसीए याविषयी खरच सेवा पूर्ववत झाली आहे का यावर पडताळणी करणार आहे. इतकेच नाही तर किती उड्डाणे अजूनही विस्कळीत आहेत, किती प्रवासी अजूनही पुनर्निवासाच्या प्रतीक्षेत आहेत आणि वृद्ध प्रवाशांसाठी, वैद्यकीय प्रकरणांमुळे आणि सोबत नसलेल्या अल्पवयीन मुलांसाठी कोणत्या प्राधान्य यंत्रणा आहेत याचे स्पष्ट चित्र डीजीसीएला हवे आहे. मनुष्यबळाची व रोस्टर गॅपशी संबंधित कारण कंपनीने दिले असले तरी अनुपालनाविषयी किती तरतूद कंंपनीने केली यावरही प्रशासन विचारू शकते.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की विमान कंपनीला तिच्या अंतर्गत देखरेख प्रणालीचे स्पष्टीकरण विचारले जाईल आणि तिचे नेटवर्क किती वेळात पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे याबाबत विचारणा होणार आहे.डीजीसीएने इंडिगोला सक्रिय वैमानिक आणि केबिन क्रूचची नवीन आकडेवारी तसेच येत्या काही महिन्यांसाठी त्यांची अपेक्षित भरती आणि मोठ्या प्रमाणात रद्दीकरण होऊ शकणाऱ्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) उल्लंघनांना टाळण्यासाठी अंमलात आणल्या जाणाऱ्या उपाययोजना घोषित करण्यास सांगितल्या आहेत अशी खात्रीलायक माहिती दिली जात आहे.किती प्रवाशांना पर्यायी इंडिगो फ्लाइटमध्ये हलवण्यात आले आणि किती प्रवाशांना इतर एअरलाइन्समध्ये जागा देण्यात आल्या याची माहिती एअरलाइनने द्यावी अशीही विचारणा कंपनीला चौकशीदरम्यान केली जाईल अशी माहिती पुढे येत आहे.






