नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा करत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना खडसावले. मालवणीतील अतिक्रमण आणि एका शैक्षणिक संस्थेवरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
मुंबई पालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेतील शिक्षक भरतीवरून वादाला सुरुवात झाली. अस्लम शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “स्वयंसेवी संस्थेमार्फत या शाळेत शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. मात्र, हे शिक्षक टीईटी किंवा सीटीईटी या कोणत्याही परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. अपात्र शिक्षकांच्या भरतीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यात खेळखंडोबा सुरू आहे”, असा आरोप त्यांनी केला.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या आरोपांना उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेच्या धोरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “बीएमसीने २००७ पासून शाळा खासगी संस्थांना दत्तक देण्याचे धोरण राबवले आहे. या धोरणांतर्गत आजपर्यंत ३७ शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. या संस्थांना फक्त शिक्षकांचे पगार आणि शाळा चालवण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी असते, त्यांना शाळेवर कोणताही मालकी हक्क मिळत नाही.” लोढा यांनी पुढे सांगितले की, मालवणी टाऊनशिप शाळा पूर्वी फझलानी ट्रस्टसोबत भागीदारीत चालवली जात होती. तेव्हा स्थानिक आमदारांना (अस्लम शेख) कोणताही आक्षेप नव्हता. आता फझलानी ट्रस्टने जबाबदारी नाकारल्याने प्रयास फाउंडेशन पुढे आले आहे. पालकांचीही तीच मागणी आहे.
“मी सहपालकमंत्री या नात्याने पालकांच्या बाजूने उभे राहतो, त्यात काय चुकीचे आहे? विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल, तर त्याला स्थानिक आमदारांचा विरोध कशासाठी? महापालिका शाळांसाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरण राबवताना सर्वांना समान न्याय दिला जाईल”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१०० एकर सरकारी जमिनीवर कब्जापुढे मंत्री लोढा यांनी मालवणीतील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “मी पालकमंत्री या नात्याने तिथे गेलो असताना मला धमकी देण्यात आली. २०१० मध्ये मालवणीमध्ये एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्के होती. आता २०२५ मध्ये ती ३६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या लोकांनी १०० एकर सरकारी जमिनीवर कब्जा केला आहे. हे लोक कुठून आले? या बदलामागे काय कारण आहे?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.






