मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा होतो. पण हा मार्ग दोन पदरी असल्यामुळे वाहतूक धीम्या गतीने होते. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला. पण हा रस्ता अनेक ठिकाणी वन क्षेत्रातून जातो. यामुळे निवडक ठिकाणी चौपदरीकरण आणि काही ठिकाणी तीन पदरी पण मजबूत रस्ता बांधून काढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. एकूण ११७ किमी.च्या या महामार्गापैकी ७० किमी. चे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकर दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा यामुळे. मुंबईकरांना आणखी मोठ्या प्रमाणात दूध भाजीपाला ताज्या स्वरुपात मिळेल.
नवी मुंबईत वाशी येथे असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज ६० ते ७० टक्के माल कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन येतो. आता रस्ता रुंदीकरणामुळे मालाची आवक वेगाने होईल.
अहिल्यानगर जिल्ह्यातून दररोज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन पुढे माळशेज घाट, मुरबाड, कल्याणमार्गे नवी मुंबईत वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत माल पोहोचतो. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतुकीचा वेग वाढेल. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिकाधिक ताजा माल पोहोचू शकेल.






