मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु मागील काही वर्षांपासून या विधानसभेतून कालिदास कोळंबकर हे सातत्याने निवडून येत असून चार नगरसेवक हे शिवसेना आणि भाजपाचे असल्याने हा बालेकिल्ला महायुतीचा मानला जावू लागला आहे. या मतदार संघात शिवसेना विरुध्द उबाठा आणि भाजपा विरुध्द उबाठा अशीच लढत पहायला मिळणार आहे. केवळ एकमेव प्रभाग क्रमांक २०१मध्ये मुस्लिम मतांच्या जोरावर काँग्रेसच्या उमेदवारासाठी पुरक मानला जात आहे. मात्र, या संपूर्ण मतदार संघात ठाकरे बंधूंची युती झाली तरी मनसेसाठी एकही जागा सोडण्याची शक्यता नाही तसेच मनसेलाही अनुकूल वातावरण नसल्याचे दिसून येत आहे.
वडाळा विधानसभेत भाजपाच्या एक, शिवसेनेचे तीन आणि उबाठा तसेच काँग्रेसचा प्रत्येकी एक नगरसेवक अशाप्रकारे एकूण सहा नगरसेवक आहेत. त्यामुळे या विधानसभेत महायुतीच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने तसेच उबाठाला आपली संख्या अधिक वाढवण्यासाठी कुठेही संधी नाही. उबाठाकडून प्रभाग २०१मधील जागा काढण्याचा दावा केला जात असला तरी काँग्रेस स्वतंत्र लढल्यास उबाठाला या प्रभागात संधी उपलब्ध होणार नाही. तर प्रभाग क्रमांक २००मध्ये सुनील मोरे यांना उमेदवारी दिल्यास उबाठाच्या उर्मिला पांचाळ यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होवू शकेल. मोरे यांचा हा जुना प्रभाग असून पाच वर्षांत उर्मिला पांचाळ यांनीह काम केल्याने तशाप्रकारे उमेदवारी जाहीर झाल्यास वडाळा विधानसभेतील या प्रभागातील लढत चुरशीची होवू शकेल असा अंदाज आहे. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपा आणि शिवसेनेसाठी कोणत्या जागा सोडल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लोकसभेतील वडाळा विधानसभेतील निकालाची आकडेवारी
अनिल देसाई ,उबाठा : ४९,१११
राहुल शेवाळे, शिवसेना : ५९,७४०
वडाळा विधानसभेतील निकालाची आकडेवारी
कालिदास कोळंबकर, भाजपा : ६६,८००
श्रध्दा जाधव, उबाठा : ४१,८२७
स्नेहल जाधव, मनसे : ६९७२
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्, रेस्टॉरंट, पब, बारची होणार तपासणी मुंबई ...
प्रभाग क्रमांक १७७ (महिला)
हा प्रभाग पूर्वी महिला आरक्षित होता, आता पुन्हा एकदा आरक्षण तेच राहिले आहे. या प्रभागातून भाजपाच्या नेहल शाह या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या, आता पुन्हा एकदा आरक्षण तेच राहिल्याने भाजपाकडून नेहल शाह यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु नेहल शाह यांनी हा प्रभाग चांगल्याप्रकारे बांधला असला भाजपाकडून जेसल कोठारी हे आपल्या पत्नीसाठी प्रयत्न करत आहेत. पण भाजपाकडूच यापूर्वी चांगल्याप्रकारे कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांचा पत्ता कापण्याचा कोणताही विचार नसल्याने जेसल कोठारी यांचा प्रयत्न किती यशस्वी ठरेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर काँग्रेसकडून नयना शेठ इच्छुक असून उबाठाकडून उमेदवाराचा शोध सुरु आहे, तर मनसेकडून अनामिका बोरकर यांच्या नावाची इच्छुक म्हणून चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक १७८ (सर्वसाधारण)
हा प्रभाग पूर्वी सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव होता, आता पुन्हा एकदा याच प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. या प्रभागावर शिवसेनेचा दावा आहे. मात्र मागील निवडणुकीत भाजपाचे जेसल कोठारी यांचा काठावर पराभव झाला होता. परंतु पुढे अमेय घोले यांनी या प्रभागात चांगल्याप्रकारे पाय रोवले असून त्यातुलनेत पुढे भाजपाच्या कोठारी यांचाकडून तशाप्रकारची बांधणीच झालेली नाही. त्यामुळे आजच्या घडीला शिवसेनेच्यावतीने अमेय घोले यांची उमेदवारी पक्की मानली जात असून उबाठाकडून या मतदार संघात माधुरी मांजरेकर यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच निलेश बडदे यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून उमेदवार नसल्यास शेवटी रघुनाथ थवई मैदानात उतरु शकतील असे बोलले जात आहे. त्यामुळे अमेय घोले यांच्यासाठी हा मतदार संघ मजबूत मानला जात असून ते कितीचे मताधिक्य घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
प्रभाग क्रमांक १७९ (महिला)
हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण होता, परंतु आता महिला आरक्षित झाला आहे. त्यामुळे याठिकाणी निवडून आलेल्या काँग्रेसचे सुफियान वणू यांना आता दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे. या प्रभागातून काँग्रेसच्यावतीने आयेशा सुफियान वणू यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचारात आहेत. तर उबाठाकडून सचिन खेडेकर यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागातून काठावर पराभूत झालेल्या तृष्णा विश्वासराव हे निवडणूक लढवतील असे बोलले जात असले तरी त्या प्रभाग क्रमांक १८०मधून इच्छुक असल्याने या प्रभागातून इच्छुक उमेदवाराचे नाव पुढे आलेले पहायला मिळत नाही.
प्रभाग क्रमांक १८१ (सर्वसाधारण)
हा प्रभाग यापूर्वी ओबीसी महिलाकरता राखीव होता, पण आता हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गाकरता अर्थात खुला प्रवर्गाकरता राखीव झाला आहे. या प्रभागातून काँग्रेसच्या तिकीटावर पुष्पा कोळी या निवडून आल्या होत्या. परंतु कोळी आता शिवसेनेत असल्याने शिवसेनेकडून पुन्हा कोळी यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर उबाठाकडून अनिल कदम किंवा प्रेसीला कदम इच्छुकांच्या यादीत आहेत. तर काँग्रेसकडून उमेदवाराच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत नाही. काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून कोळी या निवडून आल्या असल्याने काँग्रेस कुणाला उमेदवारी देते आणि पुष्पा कोळी यांच्यासमोर निभाव लागतो का याकडे सर्वांचे लक्ष असेल
प्रभाग क्रमांक २००(सर्वसाधारण)
हा प्रभाग यापूर्वी एस सी महिलाकरता राखीव होता. त्यामुळे या प्रभागातून उबाठा शिवसेनेच्या तिकीटावर उर्मिला पांचाळ या निवडून आल्या होत्या. पण हा प्रभाग आता खुला झाल्याने उबाठा शिवसेनेकडून उर्मिला पांचाळ किंवा उल्हास पांचाळ निवडणूक रिंगणात उतरू शकतात. तर या प्रभागात शिवसेना आणि भाजपाकडून दावा केला जात आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक सुनील मोरे हे इच्छुकांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत, तर भाजपाकडून गजेंद्र धुमाळे हेही इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून सुरेश काकडे आणि नितीन मोहिते यांच्या नावाची चर्चा आहे, आणि मनसेकडून प्रसाद सरफरे यांच्या नावाची चर्चा ऐकायला येत आहे.
प्रभाग क्रमांक २०१(महिला)
हा प्रभाग पूर्वी महिलाकरता राखीव होता, पुन्हा एकदा अारक्षण कायम राहिले आहे. या प्रभागातून काँग्रेसच्या तिकीटावर सुप्रिया मोरे निवडून आल्या होत्या, परंतु आता सुप्रिया मोरे या शिवसेनेत आहेत. त्यामुळे सुनील मोरे यांची वर्णी प्रभाग २००मध्ये लागल्यास या प्रभागातून शिवसेनेचा किंवा भाजपाचा उमेदवार दिला जावू शकतो. या प्रभागातून उबाठाकडून रचना अगरवाल आणि सरीता मांजरे यांच्या नावाची चर्चा आहे. तर समाजवादी पक्षाकडून साजीद तसेच काँग्रेसकडून बब्बू खान यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळत आहे.