पक्षांच्या युती, आघाडींबाबत उत्सुकता

वार्तापत्र : मध्य महाराष्ट्र


महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, प्रत्येक पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्यानंतर शहरातील प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कोण कोणाशी युती करणार, कोण कोणाशी आघाडी करणार याबाबत उत्सुकता आहे.


निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या राजकीय हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. भाजप स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी तयारीला लागली आहे, तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी हातमिळवणी करण्यासाठी चाचपणी करून भाजपवर दबाव आणत आहे. महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मनसेशी युती करण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे आता शिवसेना-मनसे एकत्र आल्यास काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसने विरोधी भूमिका घेतल्यास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असणार आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष हे तिन्ही पक्ष स्वबळावर की महायुती, याबाबत राज्य पातळीवरील नेत्यांच्या आदेशाकडे लक्ष लागले आहे.


पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत ९७ नगरसेवक निवडून आल्याने भाजपने ‘मिशन १२५’ निश्चित केले आहे. स्वबळावर निवडणुका लढवण्यावर भाजपचा जोर आहे. त्यानुसार भाजपने तयारीही सुरू केली असून, विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांना सुरुवात केली आहे. मागील महिन्यात झालेल्या भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ‘मिशन १२५’ निश्चित करण्यात आले आहे. पक्षबळकटीसाठी सर्वांना प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे. अन्य पक्षातील प्रभावी पदाधिकाऱ्यांना यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. भाजपने सगळ्या नियुक्त्या करून व्यूहरचनेत आघाडी घेतली आहे. महायुती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षांसोबत मिळते-जुळते घ्यावे लागणार आहे. मागील निवडणुकीत या दोन पक्षांबरोबर भाजपने दोन हात करून सत्ता मिळवली होती. अशा परिस्थितीत पुण्यात स्वबळावर लढण्यासाठी भाजप पदाधिकारी आग्रही आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी प्रचंड आशावादी आहे. पण, अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आणि जनता दरबार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झंझावात थंडावला होता. आता पुन्हा एकदा पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप या दोघांची शहराध्यक्षपदी निवड झाली. भाजप स्वबळाच्या दिशेने जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकीय दबावतंत्र सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबत आघाडीची चाचपणीही सुरू आहे. पण, असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त करत काही काळासाठी राजकारण सोडण्याचेही जाहीर केल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल.


दुसरीकडे शिंदेंची शिवसेना सवंगड्यांच्या शोधात आहे. रवींद्र धंगेकर वगळता पक्षातील अन्य स्थानिक नेते फारसे आक्रमक दिसून येत नाहीयेत. शहरातील पक्षाची स्थिती कमकुवत आहे. त्यामुळे पक्षबळकटीसाठी अन्य पक्षातील पदाधिकारी पक्षात येतील का, याची चाचपणी सुरू आहे. मात्र, अद्याप एकही पदाधिकारी, माजी नगरसेवक पक्षाच्या हाती लागले नसल्याने पक्ष शांततेच्या भूमिकेत दिसून येत आहे. फक्त नाना भानगिरे हे माजी नगरसेवक पक्षाकडे आहेत. प्रसंगी धंगेकर यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. पण, प्रत्येक प्रभागात सुशिक्षित आणि तरुण उमेदवार देण्यावर भर देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस सध्या सुस्त अवस्थेत दिसून येत आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका घेण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतला असताना काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची भाषा केल्याने दोन शहराध्यक्ष नेमण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची नामुष्की ओढवली आहे.


यावरूनच पक्षबळकटीसाठी काँग्रेसची तयारी नसल्याचे चित्र दिसून येत आहे. साडेतीन वर्षांत काँग्रेसकडे पूर्णवेळ शहराध्यक्षही नाही. एकेकाळी महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या काँग्रेसचे गेल्या निवडणुकीत फक्त नऊ नगरसेवक निवडून आले होते. पक्षातील गटबाजीही उसळून आल्याने काँग्रेस सध्या कुठल्याच चित्रात नाही. निवडणुका जवळ आल्या तरी काँग्रेसकडून उमेदवारी घेऊन लढण्यास कोणी फारसे इच्छुक दिसत नाहीत. त्यामुळे सध्या तरी पुणे शहारातील काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची वानवा असल्याचे चित्र आहे. सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करता यावेत यासाठी प्रभागातील लोकसंपर्क असलेल्या डॉक्टर, वकिलांना उमेदवारी घेण्यासाठी गळ घालण्याची नामुष्की काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षासोबत आघाडी करायची की नाही याबाबत दोन मतप्रवाह आहेत. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा याला ठाम विरोध आहे. मविआतील शिवसेना ठाकरे पक्षाचा फारसा प्रभाव शहरात नाही. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षासोबत हातमिळवणी केल्यास निवडणुकीत फायदा होईल. असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या दोन मतप्रवाहांमुळे पक्षात विसंवाद निर्माण झाला आहे हे मात्र नक्की.


शिवसेना ठाकरे गटाची पुण्यात अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. प्रभावी नेता पक्षात नाही. राज्य पातळीवरील नेत्यांनी शहरात लक्ष घालायला सुरू केले आहे. शिवसेना ठाकरे गटाने सर्वच्या सर्व जागी उमेदवार देण्याची तयारी केली आहे. मनसेसोबत जायचे की नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. पण, सर्वच ठिकाणी उमेदवार देणार असल्याने मनसेवर शिवसेनेचा भरोसा नाही का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पण, शिवसेनेने मनसेसोबत वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्याची शक्यता वर्तवली आहे. मनसेचे तळ्यात- मळ्यात सुरू आहे. आघाडीत जायचे की नाही याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. पक्षवाढीसाठी प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे निवडणुका आल्या असून, मनसेचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, असे दिसून येत आहे.


- प्रतिनिधी

Comments
Add Comment

बदलत्या धोरणाने साखरपट्टा हैराण

वार्तापत्र : दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्राचा साखरपट्टा काळानुसार उद्योग-विकासाचा ठेवा असला तरी, आताची

कोकणात मळभाचे सावट

वार्तापत्र : कोकण पूर्वी वर्षभरात कृषीची एक दैनंदीनी होती. आता तसे काही उरले नाही. धुक्यात रस्ते हरवतात. साहजिकच

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अर्थ विशेष - खरच आपल्याला संपूर्णपणे बाबासाहेब कळलेत? कृपया त्यांना मर्यादित करू नका !

मोहित सोमण आज डॉ बाबासाहेब आंबेडकर ६९ वा महानिर्वाण दिन आहे. खरच समाजाला संपूर्णपणे बाबासाहेब आंबेडकर समजलेत का?

राजकीय तत्त्वज्ञानी

रवींद्र तांबे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६९ वा महापरिनिर्वाण दिन. १४

मतमोजणी पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात नाराजी

अविनाश पाठक मतमोजणी १९ दिवस पुढे ढकलली गेल्यामुळे सर्व ठिकाणच्या ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये बंद झालेल्या

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप, तरुण कलाकारांसाठी सुवर्णसंधी

सुरेश वांदिले भारतीय शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, रंगमंच, दृष्यकला, लोककला, पारंपरिक आणि देशी कला, सुगम