नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून वर्तवला जातोय. तर दुसरीकडे एआयचा वापर म्हणजे पुढारलेला देश अशी प्रतिमा झाली आहे. यासाठी सर्वच देशांमध्ये एआय हब तयार करण्यासाठी स्पर्धा सुरु असतानाच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत मायक्रोसॉफ्टने भारतात १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. मायक्रोसॉफ्टची ही आतापर्यंतची आशियातील सर्वात मोठी गुंतवणुक आहे. याबाबत सत्या नडेला आणि पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितले आहे.
When it comes to AI, the world is optimistic about India! Had a very productive discussion with Mr. Satya Nadella. Happy to see India being the place where Microsoft will make its largest-ever investment in Asia. The youth of India will harness this opportunity to innovate… https://t.co/fMFcGQ8ctK
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2025
सत्या नडेला यांच्या या घोषणेनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘एआयच्या बाबतीत जग भारताबद्दल आशावादी आहे. माझी सत्या नडेला यांच्याशी महत्त्वाची चर्चा झाली. मला आनंद आहे की भारत असा देश बनत आहे जिथे मायक्रोसॉफ्ट आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. भारतातील तरुण नवीन कल्पनांद्वारे जगात क्रांती करण्यासाठी एआयच्या शक्तीचा वापर करण्यासाठी मिळणाऱ्या या संधीचा फायदा घेतील.’
पंतप्रधान मोदी आणि नडेला यांच्यातील यावर्षीची ही दुसरी भेट आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही या दोघांची भेट झाली होती. पंतप्रधानांच्या भेटीनंतर नडेला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले की, आम्हाला एआय क्षेत्रात भारतासोबत काम करायचे आहे. भारताला एआय-फस्ट बनवण्यासाठी आणि विविध क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.’
सत्या नडेला सध्या मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. स्टीव्ह बाल्मर यांच्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी सीईओ पद स्वीकारले होते. त्यानंतर जॉन डब्ल्यू. थॉम्पसन यांच्यानंतर ते २०२१ मध्ये मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बनले. यापूर्वी ते मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि एंटरप्राइझ ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष होते.






