मुंबई : महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीने दिलासा दिला आहे. महायुती सरकारने सेवाशर्तींच्या विनियमनात महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये याबाबतचे अध्यादेश सादर केले. त्यानुसार, खासगी कर्मचाऱ्यांना अधिकची साप्ताहिक सुट्टी मिळणार असून, कामाचे तास आणि ओव्हरटाइममध्ये लवचिकता आणली जाणार आहे.
कामगार मंत्र्यांनी सादर केलेल्या अध्यादेशानुसार, छोट्या व्यावसायिकांना नोंदणी आणि इतर नियमांसाठी १० कर्मचाऱ्यांची मर्यादा आता २० पर्यंत वाढवली जाईल. म्हणजे २० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना फक्त व्यवसायाची माहिती द्यावी लागेल, पूर्ण नोंदणीची गरज भासणार नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या इतर सुरक्षा आणि त्यासंबंधीचे कायदे कायम राहतील. कामाच्या तासांमध्येही लवचिकता आणली जाईल. आठवड्यात एकूण ४८ तासांच्या मर्यादेत राहून, दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० पर्यंत वाढवले जातील. यात विश्रांती कालावधीचाही समावेश आहे. हे बदल आर्थिक व्यवहार वाढवण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आस्थापनांना मदत करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.






