मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री इडियट्स’चा सिक्वेल बनणार असल्याची मोठी घोषणा समोर आली आहे. आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित हा बहुप्रतीक्षित सिक्वेल २०२६ मध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
पहिल्या भागाने निर्माण केलेला नॉस्टॅल्जिया, कॉलेज लाईफमधील ती धम्माल आणि मैत्रीची गोष्ट भारतीय सिनेमात विशेष ठरली. आता सिक्वेलच्या माध्यमातून ही कथा नवीन वळणांसह पुढे सरकणार असून, जुन्या आठवणी आणि नवे टच यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ऑल इज वेलची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार
देशभर २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडियट्स’ने प्रेक्षकांच्या मनात अमिट छाप सोडली होती. ‘ऑल इज वेल’ हे गीत आणि त्याचा संदेश आजही लोकांच्या ओठांवर आहे. त्यामुळे सिक्वेलची घोषणा होताच सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असून, फॅन्समध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात असून, संपूर्ण टीम सध्या शूटिंगच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त असल्याचे सूत्रांकडून समजते.
रँचो, राजू, फरहानचा ट्रायो परत मिळणार
पहिल्या भागातील हिट स्टारकास्ट तशीच राखण्यात आली आहे. आमिर खान पुन्हा रँचोच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर आर. माधवन आणि शर्मन जोशीही आपल्या जुन्या भूमिकांसह परतणार आहेत. करीना कपूर खानही या सिक्वेलचा भाग असल्याचे पुष्टीकरण झाले आहे. दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिराणी सांभाळणार असून, निर्मितीत विधु विनोद चोप्रा, हिराणी आणि आमिर खान यांचा सहभाग असेल.
आमिर आणि करीना पुन्हा एकत्र – जादू परत चमकेल?
‘थ्री इडियट्स’मधील आमिर–करीना ही जोडी विशेष लोकप्रिय झाली होती. त्यानंतर ते दोघे ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये झळकले, मात्र त्या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ‘थ्री इडियट्स २’मध्ये ही जोडी पुन्हा तीच जादू दाखवेल का? याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. विशेषतः पिया आणि रँचोची केमिस्ट्री हा या सिक्वेलमधील प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
हिराणींची खास स्टोरीटेलिंग स्टाईल, भावनिक टच, कॉमेडी आणि सामाजिक संदेश यांची मिक्स्ड प्लेट पुन्हा एकदा प्रेक्षकांना मिळणार असल्याची खात्री व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात ‘थ्री इडियट्स’चा सिक्वेल हा बॉलिवूडमधील सर्वात चर्चेचा प्रोजेक्ट ठरणार आहे.






