सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे
थाई चव आणि भारतीय मसाले एकत्र आले की तयार होतात इंडियन स्टाईल झणझणीत आणि कुरकुरीत थाई स्प्रिंग रोल...
हलक्या भाज्या, नूडल्स आणि सॉसचा मस्त फ्युजन तडका देऊन बनवलेले हे रोल्स कोणत्याही स्नॅक्समध्ये झटपट तयार होतात आणि सगळ्यांनाच खूप आवडतात. हलका स्नॅक असो, पार्टी स्टार्टर असो किंवा संध्याकाळचा चहा–नाश्ता, हे फ्युजन स्प्रिंग रोल्स म्हणजे सर्वांना आवडणारा परफेक्ट पर्याय. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ भाज्या - प्रत्येक घासात थायलंडची झाक आणि भारतीय चवीचे समाधान देणारा हा पदार्थ सर्वांना नक्कीच आवडेल.
साहित्य : कोबी (बारीक चिरलेला) - १ कप, गाजर (किसलेले) - अर्धा कप, सिमला मिरची - अर्धा कप, पातीचा कांदा - पाव कप, शिजवलेले शेवई/नूडल्स - अर्धा कप, आले–लसूण पेस्ट - १ टीस्पून, थाई रेड करी पेस्ट - १ टीस्पून, सोया सॉस - १ टीस्पून, थाई स्वीट चिली सॉस - १ टेबलस्पून, मिरची फ्लेक्स - अर्धा टीस्पून, काळी मिरी - पाव टीस्पून, मीठ - चवीनुसार, तेल - १ टेबलस्पून, स्प्रिंग रोल शीट - १२-१४, ४ चमचे पाणी + १ चमचाभर मैदा (कडा चिकटवण्यासाठी), तेल - तळण्यासाठी.
कृती :
- कढईत तेल गरम करा. आले-लसूण पेस्ट घालून परता. गाजर, कोबी, सिमला मिरची घालून थोडे शिजेपर्यंत परता. आता थाई रेड करी पेस्ट + सोया सॉस + स्वीट चिली सॉस घाला. नूडल्स घालून मिसळा. मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स घालून २ मिनिटे परता. गॅस बंद करून स्प्रिंग ओनियन घाला. (टिप: फिलिंग कोरडे हवे, ओलसर असेल तर रोल फुटतात.)
- स्प्रिंग रोल शीटवर २ टेबलस्पून फिलिंग ठेवा.
- कडा आत वळवून घट्ट रोल करा. मैदा-पाणी मिश्रणाने कडा चिकटवा. सर्व रोल्स तयार करून १० मिनिटे झाकून ठेवा. तेल मध्यम आचेवर गरम करून रोल्स सोनेरी, कुरकुरीत होईपर्यंत तळा.
- एअरफ्रायरमध्ये करायचे असल्यास : १८०°C वर १०-१२ मिनिटे ठेवा. वर थोडे तेल ब्रश करा. थाई-इंडियन डिप सॉस (सुपर टेस्टी फ्युजन चटणी), थाई स्वीट चिली सॉस - २, टेबलस्पून चिंच-गूळ चटणी - १ टेबलस्पून, तिखट - चिमूट, लिंबू - काही थेंब सगळे एकत्र करून रोल्ससोबत सर्व्ह करा.






