नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणी सभागृहात स्पष्टीकरण देताना सांगितले की, रोहित आर्याने सीएसआर प्रकल्पाच्या नावाखाली परवानगीशिवाय शाळांकडून पैसे गोळा केले होते, त्यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली होती.
भोयर यांनी सांगितले की, ओलीस ठेवलेल्या लहान मुलांच्या सुखरूप सुटकेच्या दृष्टीने आणि समयसूचक कारवाई म्हणून आर्याचे एन्काउंटर करावे लागले. बॅलिस्टिक रिपोर्टनुसार त्याच्या पिस्तुलात गोळ्या होत्याच. आतापर्यंत या प्रकरणी ११५ जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. सीएसआर अंतर्गत दोन टप्प्यांचे ९ लाख ९० हजार रुपयांचे पेमेंट मात्र सरकारने केलेच असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले.
त्यावर विजय वडेट्टीवार यांनी सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, कमरेच्या खाली गोळी मारण्याचा नियम असताना थेट डोक्यात का गोळी मारली? एन्काउंटरसाठी विशेषतः वाघमारे यांनाच का आणले? आर्याने ज्या मंत्र्यांचे नाव घेतले त्यांची चौकशी झाली काय? त्याची देयके सरकारकडे खरोखर थकीत होती का? राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे नेते जयंत पाटील यांनी ठेकेदारांनंतर आता सल्लागारांचेही पैसे थकवले जाण्याचा नवा प्रकार समोर आल्याचा आरोप करीत सखोल चौकशी करून अधिवेशनात अहवाल सादर करण्याची मागणी केली. नाना पटोले आणि दिलीप लांडे यांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले.
या प्रकरणात आर्याने ऑडिशनच्या नावाखाली ७ ते १४ वयोगटातील सुमारे १७ मुला-मुलींना ओलीस ठेवले होते आणि माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची आग्रहाची मागणी केली होती. यापूर्वी त्याने केसरकर यांच्या घरासमोर उपोषणही केले होते.






