नितेश राणेंच ठाकरे पिता-पुत्राला 'चॅलेंज'
नागपूर': आमदार महेंद्र दळवी यांच्या कथित 'नोटांच्या बंडलां'च्या व्हिडिओमुळे राज्यात खळबळ उडालेली असतानाच, भाजप आमदार नितेश राणे यांनी यात उडी घेत ठाकरे पिता-पुत्राला 'चॅलेंज' केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कर्जत येथील फार्महाऊसवर नोटांची बंडलं गाडल्याचा गंभीर आरोप राणेंनी केला. ते म्हणाले, "कधीतरी कर्जतच्या फार्महाऊसवर तुम्ही सगळेजण पत्रकार चला. आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवलीय, हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विचारा ना जरा!" राणे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्च ऑपरेशन करण्याची मागणी करत, ठाकरेंच्या कथित फार्महाऊसवर छापा टाकल्यास पळापळ होईल, असा दावा केला.
दळवींच्या व्हिडिओवर ठाकरे गटाचे आमदार व कार्यकर्ते करत असलेल्या आरोपांना राणे यांनी जगातील सर्वात मोठे आश्चर्य असे संबोधले. कॅशच्या सगळ्या विषयांवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी बोलूच नये, असा सज्जड दमही त्यांनी भरला. यापुढे बोलताना राणे यांनी आदित्य ठाकरेंनी सरकारवर केलेल्या 'शेतकरी उपाशी, सरकार तुपाशी' या टीकेलाही उत्तर दिले. ते म्हणाले, "म्हणून तर बोलतो ना, उद्धव ठाकरे उपाशी, शिवसैनिक उपाशी तोच विषय आहे हा!"






