एरवी गोवा हे तसे शांत राज्य. तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. अर्थात अगदी उत्तर प्रदेश किवा बिहारसारखी परिस्थिती नाही. पण तिथे क्लब संस्कृती रुजली आहे. या क्लब संस्कृतीत तल्लीन झालेले २५ जण या क्लबमध्ये जीवनाचा आनंद घेत असतानाच मृत्युमुखी पडले. ही घटना घडल्यानंतर आता या क्लबच्या उभारणीत अनेक गोष्टी समोर येत आहेत. या संपूर्ण घटनेला जबाबदार आहेत ती गोव्यातील भ्रष्टाचार आणि बेकायदा बांधकामे आणि त्यात बरबटलेले अनेकांचे हात. बर्च या उत्तर गोव्यातील लोकप्रिय क्लबमध्ये शनिवारी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत २५ जण होरपळून ठार झाले. बेली डान्स चालू असताना हा प्रकार घडला आणि पहिला मजला आगीने संपूर्ण वेढला गेला. हा क्लब मिठागराच्या जमिनीवर बांधला होता आणि त्याच्यातून येण्या-जाण्यासाठी फारच चिंचोळा मार्ग होता. त्यामुळे डीजे सुरू असताना १५० लोक त्या अरुंद जागेत जमले होते आणि नंतर नृत्यांगनांनी हातात मेणबत्त्या घेऊन नाच सुरू केला आणि तेच खरे कारण होते असे सांगण्यात आले. हे तात्कालिक कारण झाले. नाच सुरू असताना फटाकेही फोडले जात होते. त्यामुळे आगीच्या ज्वाळांत लाकडी सिलिंग सापडले आणि आगीचा भडका उडाला. काही लोक खालच्या मजल्याकडे धावले; परंतु बेसमेंट किचनची जागा अरुंद असल्यामुळे २३ लोक गुदमरून मरण पावले. दोन जळालेले मृतदेह नंतर जिन्यावर सापडले. मुळात हा क्लब अत्यंत अरुंद जागेत होता आणि ही दुर्घटना घडण्यास खरे कारण आहे ते क्लब मालकाची अनिवार भूक आणि सगळे नियम धाब्यावर बसवून केलेली कामे. क्लबचा मालक सौरभ आणि गौरव लुथरा हे आहेत.
गोव्यात झालेल्या या अग्नितांडवानंतर सर्वत्र शांतता होती. गोवा हे पर्यटन राज्य म्हणून विकसित आहे. तेथील अर्थव्यवस्थाही पर्यटनावरच चालते. पण ७ डिसेंबर हा दिवस गोव्याच्या पर्यटनाच्या इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल. जे लोक गोव्यात नव वर्ष साजरे करण्यासाठी येतात त्यांच्यावर आपल्या प्रियजनांसाठी शवपेटिका घेऊन जाण्याची वेळ आली. अनेक वर्षांपासून गोव्यातील नाईट लाईफ आणि क्बब संस्कृतीबद्दल आवाज उठवले जात आहेत. तेथे अनेकांना या नाईट लाईफचा मोह होतो आणि परिणामी दुर्घटना घडून त्यांचे जीव जातात. कालची घटना अशीच म्हणावी लागेल. एक तर गोव्यात बेकायदा बांधकामांवर कुणीही राजकीय नेता आळा घालू शकत नाही. गोव्यातील जो बीच साइडचा पट्टा आहे तो बेकायदेशीर आहे आणि त्याविरोधात सातत्याने आवाज उठवला तरीही राजकीय पक्ष त्याविरोधात कुणालाही कारवाई करू देत नाहीत. गेली अनेक वर्षे गोवा बेकायदेशीर बांधकामे, परवानाविरहित शॅक्स आणि नाईट क्लब्ज यांच्याशी लढत देत आहे. आगीच्या नियमांची पायमल्ली हे तर गोव्यातील रोजचे जीवन झाले आहे. या क्लबलाही फायर सेफ्टी नव्हती. त्यामुळे आग लागली, त्यात २५ जणांचे नाहक बळी गेले आणि येथील बेसमेंट तर पैसा आणि त्याच्या जोरावर राजकीय संरक्षण आणि नोकरशाहीचे वरदान यामुळे कायद्याचे राज्य पायाखाली तुडवले गेले आहे. त्यातून अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी नोकरशाही आगीपासून सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात अपयशी ठरते आणि तरीही दुर्घटना घडली. सारे काही आलबेल होते. त्यामुळे बेसमेंट तर मृत्यूचे सापळे झाले आहेत.
गोव्याच्या जीवनशैलीचा इथे गैरफायदा घेण्याची वृत्ती दिसून येते. गोव्यातील आगीची दुर्घटना ही केवळ प्रशासनाचे अपयश म्हणून पाहता येणार नाही, तर परवाने नसतानाही अशा क्लबमधून पैसा कमावण्याची भूक आहे. त्यामुळे २५ जणांचे हकनाक बळी गेले तरीही कुणालाही फारसा फरक पडणार नाही. आता अशी धक्कायदायक माहिती समोर आली आहे, की या क्लबला सेफ्टी क्लिअरन्स नव्हते. प्राथमिक सेफ्टी नॉर्म्स म्हणजे सुरक्षाविषयक निकषाचे पालनही करण्यात आले नाही. गोवा हे पर्यटन राज्य आहे आणि त्यामुळे येथे प्रत्येक पर्यटकांचा सन्मान झाला पाहिजे. पण नोकरशाही आणि क्लब मालकांची बेपर्वाई यामुळे लोकांचे जीव असुरक्षित आहेत. कालची दुर्घटना ही प्रशासकीय अपयशाचे आणि सेफ्टी नॉर्म्स म्हणजे सुरक्षेचे निकष पालन न करता मिळवलेले परवाने आणि त्यातून प्रशासनाची झालेली चांदी यांचे उदाहरण ठरावे. अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे, की त्यांना या क्लबकडे सुरक्षा निकषांची कमतरता आहे याची कल्पनाही नव्हती. ते खोटे बोलत आहेत किंवा त्यांना प्रसासकीय अपयशाची कल्पनाच नव्हती. सरकारने काही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे आणि तातडीची मदत देऊ केली आहे. ते तर झालेच पण खरा प्रश्न हा आहे, की गोव्यातील प्रशासनाला स्वत:च्या जबाबदारीची जाणीव कधी होणार आणि कधी निरपराध लोकांचे जीव जाण्याचे थांबणार. या दुर्घटनेची व्याप्ती पाहता आता यात सरकारने ठोस काहीतरी करण्याची अपेक्षा आहे. गोव्यात राजकीय पक्ष नेहमीप्रमाणे राजकारणात गुंतले आहेत आणि त्यांच्यात भाजपविरोधात आग ओकणे सुरू झाले आहे, पण एक राजकीय पक्ष यास जबाबदार नाहीत तर येथील व्यवस्था आणि वर्षानुवर्षे चाललेले कुप्रशासन यास जबाबदार आहे. गोव्यात ऐन पर्यटन हंगामात ही दुर्घटना घडल्याने अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण हाच हंगाम गोव्यातील पर्यटनाला खऱ्या अर्थाने बहर येतो. त्याच काळात ही दुर्घटना घडल्याने गोव्याच्याच नाही तर भारताच्याच एकूण अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे.






